रविवारी सायंकाळी खारघरमधील दुकानदारांची धावपळ; डॉ. सुधाकर शिंदे यांच्या कारवाईचे सामान्यांकडून स्वागत

खारघर वसाहतीत रविवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई सुरू केली. या वेळी पालिकेच्या कारवाईचा धडाका पाहून दुकानदारांची पाचावर धारण बसली. त्याहूनही उपस्थित नागरिकांच्या नजरा पालिका आयुक्तांच्या वेशभूषेकडे जास्त खिळलेल्या होत्या. दुकानासमोरील मोकळ्या जागेचा वापर करणाऱ्या दुकानदारांना सूचना करणारे आयुक्त चक्क टी शर्ट आणि हाफ पॅन्ट आल होते. त्यामुळे त्यांना ओळखण्यास अनेकांना अचडण निर्माण होत होती.

या कारवाईदरम्यान अनेक व्यापाऱ्यांची धांदल सुरू झाली.  खारघरची ओळख सांगणाऱ्या हिरानंदानी कॉम्पलेक्स येथील व्यापाऱ्यांनी सामान्य ग्राहकांच्या चालण्याच्या जागेवर आपले व्यवसाय थाटले होते. त्याचप्रमाणे तडका, गरम मसाला यांसारख्या मोठय़ा हॉटेलांचा धंद्याच्या वेळी आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे हॉटेल व्यवस्थापकांची चांगलीच धावपळ उडाली. व्यापाऱ्यांची पळापळ खारघरमध्ये होतानाची ही पहिलीच वेळ होती. हे सर्व दृष्य पाहणाऱ्या सामान्य खारघरवासियांनी आयुक्तांच्या या कारवाईचे स्वागत केले.

खारघरमध्ये खाऊ गल्या भरपूर आहेत. उत्सवचौकाच्या भोवतालपासून ते थेट हिरानंदानी कॉम्पलेक्सच्या समोरील चौकात हे अनेक फेरीवाल्यांच्या गाडय़ांवर मोठी गर्दी खाऊ खाण्यासाठी पाहायला मिळते. काही हॉटेलचालकांनी पावसाळी बांधणारे छत कायमस्वरूपी उभारून तेथेच जेवणावळी सूरु केल्या आहेत. हेच सर्व अतिक्रमन काढण्याची वेळ आयुक्त शिंदे यांनी रविवारी निवडली. रविवारची सार्वजनिक सुटी असल्यामुळे ग्राहकांची सायंकाळनंतर बाहेरील जेवणाचा बेत सुरू असताना आयुक्त व महापालिकेमुळे खारघर कसे स्वच्छ व सुंदर दिसणार याची प्रचिती खारघरवासियांना आली.

रविवारी काळ्या रंगाचे हाफ टि शर्ट आणि हाफ जिन्स अंगात घातलेले आयुक्त शिंदे व त्यांचा फौजफाटा खारघरमध्ये रात्री साडेदहा वाजेपर्यंत कार्यरत होता. यापूर्वी व्यापाऱ्यांना भोंग्या द्वारे आपले बेकायदा नामफलक काढण्याची सूचना करणारे आयुक्तांच्या ताफ्यामधील कर्मचाऱ्यांचा अर्धा वेळ आयुक्तांची ओळख सांगण्यात जात होता.

खारघरमध्ये यापूर्वी रस्त्यावरील फेरीवाल्यांकडून हप्तेखोरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या पोलिसांना अटक केली होती. महिन्याला एका चायनीज खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाडीच्या मालकाकडून पाच हजार रुपयांची लाच दिल्याचे प्रकरण मागील तीन वर्षांपूर्वी गाजले होते.