नवी मुंबई पालिका सेवेत काम करणाऱ्या मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांना गेली अनेक वर्षे पदोन्नती, अनुशेष, बिंदू नामावलीसह अन्य विविध प्रकरणामध्ये अन्याय सहन करावा लागत असल्याने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अनुसूचित जाती कल्याण समितीसमोर आपली कैफियत मांडताना अश्रू अनावर झाले.

आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार वर्षां गायकवाड, जोगेंद्र कवाडे यांच्यासह नऊ आमदारांची अनुसूचित जाती कल्याण समिती नवी मुंबईतील सिडको, पालिका, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी बुधवारी नवी मुंबईत आली होती. यावेळी पालिकेतील ८० पेक्षा जास्त कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा या समितीसमोर वाचला. याशिवाय नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत, पालिकेच्या मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय महासंघाचे अध्यक्ष शशिकांत आवळे, डॉ. अशोक जाधव यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना या समितीला सांगितल्या. पालिकेची सेवाज्येष्ठता यादी दरवर्षी प्रकाशित होणे आवश्यक असताना तसे होत नसल्याची प्रमुख तक्रार या कर्मचारी नेत्यांनी समितीकडे केली. कर्मचाऱ्यांना न्याय पदरात पाडून घेण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत असून अनुशेष भरले जात नाहीत. बिंदू नामावलीप्रमाणे भरती होत नसून याला पालिकेचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर जबाबदार असल्याचा आरोप या कर्मचारी नेत्यांनी केला. पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नसल्याने पगारवाढ होत नाही. त्यामुळे घर चालविणे कठीण जात आहे.