इसवीसन ४३ मध्ये  लंडोनियम  या गावात आलेल्या रोमन सम्राट क्लाडीयसने टेम्सवरील नवा लाकडी पूल बांधला आणि संरक्षणासाठी दक्षिणेकडील नदी किनारा सोडून बाकी तीन बाजूंनी लंडोनियम भोवती दगडी तटबंदी केली. १५ फूट उंच, आठ फूट रुंद अशा या भक्कम तटबंदीला सात मोठी प्रवेशद्वारे ठेवली. बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्यासाठी तीन किलोमीटर लांबीच्या या तटबंदीमध्ये जे रोमन शहर वसले त्याचे नाव पडले ‘सिटी ऑफ लंडन’.

रोमन राज्यकर्त्यांनी हे  लंडोनियम म्हणजेच पुढे झालेले सिटी ऑफ लंडनची अंतर्गत रचनाही  शिस्तबद्ध केली. त्यात राजवाडा, प्रार्थनास्थळे, घरे आणि बाजारपेठही वसवली. रोमनांनी तिथे शेतीच्या नवीन पद्धती सुरू केल्या आणि रोमन शैलीच्या इमारती बांधल्या. पाचव्या शतकाच्या सुरुवातीला रोमन साम्राज्याचा  ऱ्हास सुरू झाल्यावर  सन  ४१० मध्ये रोमन राज्यकत्रे लंडनवरील रोमन ब्रिटनची सत्ता सोडून रोमला गेले. लंडनवरील रोमन लोकांचा साडेचारशे वर्षांचा अंमल आणि फ्रान्सचे सान्निध्य यामुळे इंग्लिश भाषेत बरेचसे फ्रेंच शब्द आणि रोमन शब्द यांची सरमिसळ झालेली आढळते. रोमन राज्यकत्रे परतल्यावर लंडन आणि संपूर्ण इंग्लंडवर दोन शतके युरोपातील रानटी लोकांनी वस्ती करून धुडगूस घातला. आसपासच्या लहान वस्त्यांमधून लूटमार करणे हा त्यांचा उद्योग. या दोन शतकात या टोळ्यांनी रोमनांनी बांधलेल्या सुरेख वास्तूंची पार विल्हेवाट लावली. लंडनच्या इतिहासात हा काळ ‘डार्क एजेस’ म्हणून ओळखला जातो.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

बहावा  – (कासिआ फिस्टुला) 

बहरलेला बहावा पाहिला की स्वर्गलोकीसुद्धा नसेल; असं वैभव आमच्या पृथ्वीवर आहे, आणि हा वृक्ष मूळचा भारतीय आहे, याचा अभिमान वाटायला लागतो.

भारताव्यतिरिक्त म्यानमार, श्रीलंकेतही आढळणारा बहावा हा मध्यम आकाराचा पानगळीचा वृक्ष आहे. उंची साधारण ७ ते ८ मीटर इतकी. पाने संयुक्त प्रकारातली, ४ ते ८ पर्णिकेच्या जोडय़ा मिळून बनलेली असतात. एप्रिल-मे महिन्यात या झाडाची पाने गळून पडतात आणि त्याची जागा सोनेरी मोहक झुंबरांसारखे लोंबणारे पुष्पगुच्छ घेतात. प्रत्येक पुष्पगुच्छ ३० ते ५० से.मी. लांब, टोकास निमुळता आणि अंदाजे ३० ते ५० फुलांनी मढलेला असतो. गुच्छाच्या वरच्या बाजूस अर्धवट उमललेल्या कळ्या, खालच्या बाजूस पूर्णपणे उमललेली फुले आणि टोकाला कळ्या असतात.

सोनेरी पिवळीधमक असूनही शालीन वाटणाऱ्या फुलांचे ओघळू पाहणारे झुंबरच्या झुंबर  झाडावर लोंबू लागले, की बघणाऱ्याच्या तोंडातून आपोआप उद्गार निघतात, ‘‘वाहव्वा! बहावा!’’

स्त्रियांना कानात घालण्याचा मोह व्हावा, इतकी सुंदर फुले. बाहेर हिरव्या निदलपुंज. त्याच्या आत पिवळ्या नाजूक अशा पाच पाकळ्यांचे मंडल. त्याच्या आतल्या मंडलात पिवळ्याच पण जरा गडद रंगांचे दहा पुंकेसर आणि मध्यभागातून पुंकेसरातून बाहेर डोकावणारं हिरवे स्त्रीकेसर. ही मंद सुगंधित सुवर्ण फुलझुंबरं साधारण दोन आठवडे झाडावर राहतात.

फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष ‘गोल्डन शॉवर’ म्हणून इंग्रजीत ओळखला जात असला तरी त्याचे सर्वमान्य इंग्रजी नाव आहे- ‘इंडियन लॅबर्नम’. याशिवाय बहाव्याला राजवृक्ष, कर्णिकार, कंचनवृक्ष अशी कितीतरी नावे आहेत. मात्र त्याचे शास्त्रीय नाव आहे, ‘कॅशिया फिस्टुला’.  हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. फिस्टुला म्हणजे पोकळ नळी.  दंडगोलाकार लांबलचक शेंगेतला गाभुळलेल्या चिंचेसारखा गर माकडे, कोल्हे, अस्वलं आवडीने खातात.

शेंगेतला गर रेचक म्हणून तर बहाव्याची साल आणि पानं कफनाशक, त्वचाविकारांवर उपयोगी आहेत. बहाव्याचं लाकूड टणक व टिकाऊ असून घराचे खांब, शेतीची अवजारं यांसाठी वापरतात.

बहाव्याचे उपयोग कितीही असोत, पण बहरलेला बहावा पाहण्यासारखे दुसरे सुख नाही.

चारुशीला जुईकर (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org