जेथे फक्त खायचे-प्यायचे पदार्थ मिळतात ते रेस्टॉरंट. जेथे खाण्यापिण्याच्या सोयीबरोबर राहायचीही सोय असते त्याला म्हणायचे हॉटेल. परंतु मराठीत या दोन्हीला आपण हॉटेल असे एकच नाव वापरतो. रेस्टॉरंटमध्ये सगळ्यात धोक्याचा भाग म्हणजे तेथील भटारखाना, जेथे अन्नपदार्थ बनविले जातात. शहरातील भटारखान्यात इंधन म्हणून गॅसचे सिलेंडर वापरतात व एकाशेजारी एक असे ८-१० सिलेंडर्स लावून त्यांची बँक बनवतात व तेथून नळीने चुलाण्यांपर्यंत गॅस येतो. या एकूण यंत्रणेत गॅस सिलेंडर कुठे गळत नाहीत ना आणि गॅस सिलेंडरच्या बँकेपासून चुलाण्यापर्यंत येणारी नळी कुठे गळत नाही ना हे वारंवार पाहणे फार महत्त्वाचे असते. रेस्टॉरंटमधील गॅसच्या सिलेंडरचा स्फोट होऊन दोन माणसे मेली, चार माणसे मेली अशा बातम्या मधूनमधून आपण वर्तमानपत्रात वाचत असतो, त्यापासून प्रत्येकाने जपायला हवे.
रेस्टॉरंटमध्ये खायचे पदार्थ बनत असल्याने सर्व पदार्थ स्वच्छ असणे हे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी धान्य, तेले, भाजी इत्यादी सर्व कच्चा माल नीट पारखून आणायला हवा. रेस्टॉरंट मालक जास्त फायदा होण्यासाठी माल स्वस्तात कुठे मिळेल हे पाहत असतो, पण त्याचा अर्थ असा नाही की, गुणवत्तेच्या बाबतीत तो कसाही असला तरी चालेल. भाज्या, फळे नीट धुवून घ्यायला हवीत. तांदूळ, डाळीही नीट धुवून घ्यायला हव्यात. या मालाबरोबर काही अस्वच्छता पदार्थात जाऊ शकते, म्हणून या गोष्टी नीट धुण्याला फार महत्त्व आहे.
भटारखान्यात काम करणारी व टेबलावर पदार्थ पोहोचवणारी मुले रोज अंघोळ करणारी, स्वच्छ धुतलेले कपडे घालणारी अशी असायला हवीत. पिण्याचे पाणी स्वच्छ आणि जंतुरहित हवे. पिण्याच्या पाण्याचा साठा झाकून ठेवलेला असावा. जी मुले टेबलावर पाण्याचे ग्लास आणून ठेवतात त्यांनी त्यात आपली बोटे बुडणार नाहीत हे पाहिले पाहिजे. खाणे झाल्यावरच्या थाळ्या आणि कपबश्या व ग्लासेस स्वच्छ धुवून मग त्यापुढच्या गिऱ्हाइकाला द्यायला हव्यात.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी , मुंबई २२  
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा.. – आता भैरवी..
स्वरांच्या सूरमहालाची सांगता करण्याची वेळ येते तेव्हा उस्ताद श्रोत्यांवर नजर फिरवत रसिकांच्या चेहऱ्यावरील अतृप्ती, उत्सुकता आणि समाधानाच्या सूक्ष्म रेषा न्याहाळतात. तबलजीकडे पाहतात, तानपुऱ्याचे सूर पुन्हा जुळवून घेतात आणि कोणाला काहीही शब्दांनी न सुचविता भैरवी गाऊ लागतात..
रसिक श्रोत्यांच्या मनाच्या तारा एव्हाना गायकाशी तादात्म्य झालेल्या असतात. अजून काही तरी हवं असं म्हणता म्हणता, संतृप्तीची लहर मैफिलीत सहज पसरते. आता हे शेवटचं म्हणून सारे जण स्तब्ध होऊन ऐकतात. भैरवी संपते, व्यासपीठावरचं वातावरण सैलावतं.
गायक-वादक एकमेकांकडे पाहून किंचित स्मित करतात. चार-दोन क्षण शांतता आणि मग कोणाला तरी टाळ्या वाजवण्याचं भान येतं. संतुष्ट मनाने. तरीही पुन्हा कधीतरी अशीच मैफील जमावी अशा आकांक्षेने, बैठक संपते, शांत, गंभीर आणि व्याकूळ  सुरानं सजलेली भैरवी मनात रेंगाळते.
मित्रा, हेच त्या भैरवीचं वैशिष्टय़. किती अजब आहेना, हवं हवसं वाटताना, खूप उपभोगल्याचं समाधान, संपलं संपलं अशी हुरहुर वाटत असताना, भरून पावल्याची तृप्ती. भारतीय शास्त्रीय संगीतामधली ‘भैरवी’ अशी मनाला वेड लावते, ‘मिठी छुरी’सारखी जिव्हारी लागते. जखम खोल होते पण अत्तरानं मलमपट्टी करावी आणि किंचित आठवण झाली तरी हृदयात कळ उठावी आणि नकळत डोळे ओलसर व्हावेत अशी अनोखी जादू भैरवीत आहे.
या भैरवीनं कोणता संगीत प्रकार नटविलेला नाही म्हणू नको. द्रुत चालीतल्या बंदिशी, तराणा, टप्पा, ठुमरीपासून ते हिंदी फिल्मी संगीतातली हजारो गाणी. अगदी विशाल भारद्वाजच्या ‘दिल तो बच्चा है जी’पर्यंत अनेक गाणी आहेत. वाटेत पं. भीमसेनजींचं ‘जो भजे हरी को सदा’, हे भजन, ‘बोला अमृत बोला’ हे ज्योत्स्ना भोळे यांचं नाटय़गीत लागतं. प्रत्येक संगीतकारानं भैरवीला आपलंसं केलं. त्यात डावं उजवं करणं अतिशय कठीण. त्यामुळे ‘मनभावन’ हा निकष लावला तरी काही गाणी मनात सदैव रेंगाळतात. तृप्ती-अतृप्तीची शांत, गंभीर हुरहुर लावतात. यात पहिला नंबर लागतो अर्थात कुंदनलाल सैगल यांच्या ‘बाबुल मोरा नैहर छुटो जाय’ आणि ‘जब दिलही टूट गया’ यांचा. पण मित्रा, ‘भक्त सूरदास’मधलं ‘मधुकर शाम हमारे चोर.’ हे भजन मनाला अक्षरश: घरं पाडतं. सैगलनी भैरवीतली मोजकी गाणी गाऊन शब्द, सूर, मूड यांचा वैभवशाली थाट मांडला.
लता दिदींची शेकडो गाणी आहेत. ‘जैसे राधाने माला जपी.’ हे प्रेमाचं गोड गाणं आहे, तर ‘तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो’ हे भजन आहे. शंकर जयकिशनचं ‘किसीने अपना बनाके मुझको’ ही प्रणयमुग्ध भैरवी आहे. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ हे एन दत्ताचं देशभक्तिपर गाणं आहे. ‘जीतही लेंगे बाजी हमतुम’ हे रफीचं आहे. पण मित्रा मनाला चटका लावणारं लतादिदीचं ‘सावरे सावरे’ हे ‘अनुराधा’मधलं गाणं. कृष्ण-राधेच्या प्रेमामधल्या नटखट छटा, लटका राग, अनुरक्त भक्ती या साऱ्या भावना या भैरवीतून ओथंबून वाहतात. मित्रा, पुन्हा एकदा ‘सावरे’ ऐक, त्यातली सावरे ही शेवटची लकेर ऐकलीस ना तर भैरवी अंगात भिनेल रे. मनमोराची भैरवी.
 डॉ. राजेंद्र बर्वे  –drrajendrabarve@gmail.com

इतिहासात आज दिनांक.. – २८ डिसेंबर
१८८५ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंडियन नॅशनल काँग्रेस)ची स्थापना मुंबईत झाली. या संस्थेच्या स्थापनेसंदर्भात १८८५ च्या एप्रिल महिन्यात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. या पत्रकानुसार ‘इंडियन नॅशनल यूनियनची एक परिषद ता. २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत पुण्यात भरवण्याचे ठरले.  इंग्रजी भाषा उत्तम प्रकारे जाणणारे सर्वप्रांतीय राजकीय पुढारी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतील. या परिषदेचे प्रत्यक्ष हेतू दोन असतील. १) राष्ट्रीय प्रगतीच्या कार्यात अत्यंत कळकळीने भाग घेणाऱ्यांचा परस्परांशी परिचय व्हावा आणि पुढील साली हाती घ्यावयाच्या राजकीय कार्याची चर्चा करून ती कार्ये निश्चित करण्यात यावीत. अप्रत्यक्षरीत्या ही परिषद म्हणजे हिंदी लोकांच्या पार्लमेंटचे बीजच होईल आणि ती जर योग्य प्रकारे चालविण्यात आली, तर हिंदुस्थान अद्यापि कोणत्याही प्रकारच्या प्रातिनिधिक संस्था चालविण्यास नालायक आहे, या आक्षेपास हे कार्य थोडय़ाच वर्षांत, खोडता न येण्यासारखे उत्तर देऊ शकेल. आयत्या वेळी पुण्यात प्लेगची साथ आल्याने अधिवेशन मुंबईला भरले. या सभेस एकंदर ७२ प्रतिनिधी (मुंबईचे १८, पुण्याचे ८, कराचीचे २, विरमगावचे ११, सुरतेचे ६, अहमदाबाद ३ असे मुंबई इलाख्यातील ३८ ) या सभेत नऊ ठराव पास झाले.
१९३०आर्थर अँथनी मॅकडोनेल यांचे निधन. ऋग्वेदावरील संशोधनासाठी जर्मनीतील लाइपझिश् विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. दिली होती.
१९८६ अकस्मात आलेल्या वादळी पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात मोठी हानी झाली.
डॉ. गणेश राऊत  – ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची -‘काल-परवा’चे प्रतिसाद..
सदराबद्दल वर्षभरात वाचकांच्या प्रतिक्रिया येत होत्या, त्यापैकी या काही निवडक :
७ नोव्हेंबर,  आनंद ओक, मुंबई : ‘लोकसत्ता’चा मी नियमित वाचक आहे. आपण आपल्या सदरातून लहान जागेतूनही ऐतिहासिक विशेष घटनांची माहिती सोप्या भाषेत देत आहात. ते अत्यंत स्पृहणीय आहे. मी बंगलोरला जातो तेव्हा म्हैसूरच्या राजांबद्दल माहितीचे औत्सुक्य असते. आपण म्हैसूरच्या राजघराण्याबद्दल मोजक्या शब्दांत अत्यंत उद्बोधक माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद! अशीच माहिती काश्मीरच्या राजांबद्दल देऊ शकाल काय?
१० ऑक्टोबर,  जयंत वेर्णेकर, नरिमन पॉइंट, मुंबई : ‘सफर’ सदर मी आवडीने वाचतो. जागतिक इतिहासातील घटना आपण सोप्या व सुटसुटीत भाषेत वाचनीय करून ठेवता. त्याबद्दल अभिनंदन! अशा अज्ञात किंवा दुर्लक्षित घटनांविषयी आपण आणखी लिहावे.
११ एप्रिल २०१२ श्वेता गोराणे, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर : आपल्या ‘सफर’ या सदरातील ‘स्कॉटलंड यार्ड’ लेख वाचल्यापासून या सदराची मी नियमित वाचक झाले आहे. आम्ही विद्यार्थी तुमच्या लेखांविषयी नेहमी चर्चा करतो व अभ्यासात आम्हाला त्याचा फायदा नक्कीच होत आहे. तुम्हाला एवढी सर्व माहिती कोठून मिळते? रॉक ऑफ जिबाल्टरविषयी आपण काही लिहाल काय? तुमच्या पुढील लेखांना शुभेच्छा!
२४ मार्च,  मधुकर गोगटे, पुणे : आपण इतिहासातील अनेक गुंतागुंतीच्या घटना सोप्या भाषेत उलगडून ‘सफर’ या सदरात लिहिता, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या गोगिया पाशाविषयी लेखात खूपच सुरस माहिती आहे. त्याचे सुभाष गोगिया हे चिरंजीव माझ्या चांगल्या परिचयाचे होते. धन्यवाद.
(शनिवारी : प्रतिसादांची सफर)
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com