पश्चिम-मध्य इटालीत टायऱ्हेनियन समुद्रकिनाऱ्यावर आर्नो नदीच्या मुखाशी पिसा हे शहर वसले. पिसा प्रसिद्ध झाले ते तिथल्या कॅथ्रेडलच्या झुकलेल्या उंच बेल टॉवरमुळे. इसवी सनपूर्व काळात प्राचीन ग्रीसमध्ये ‘पिसा’ या नावाचे शहर राज्य होते. या राज्याच्या क्षेत्राला पिसाटिस म्हणत. पिसा राज्यक्षेत्रातील ऑलिम्पिया या शहरात सुरुवातीचे ऑलिम्पिक क्रीडा महोत्सव भरवले जात. ग्रीक पुराणातील प्रसिद्ध ट्रोजन युद्ध समाप्तीनंतर ग्रीक पिसाचा राजा पेलॉप्स इ.स. पूर्व तेराव्या शतकात सध्याच्या इटालीतील टायऱ्हेनियन समुद्रकाठी आर्नो नदीच्या मुखाशेजारी येऊन राहिला. तिथे त्याने जी वस्ती स्थापन केली तिला आपल्या राज्याचेच ‘पिसा’ हे नाव दिले. हेच ते पुढे तिथल्या कलत्या मनोऱ्यामुळे प्रसिद्ध झालेले इटालीतील शहर पिसा! पेलॉप्स राजाबरोबर आलेल्या ग्रीक लोकांशिवाय सुरुवातीच्या काळात या इटालीयन पिसा गावात एट्रस्कन, लिगुरियन इत्यादी जमातींच्या लोकांनी वस्ती केली. ग्रीसमधील मूळचे पिसा राज्य पुढे इ.स.पूर्व ५७०मध्ये नष्ट झाले. इ.स.पूर्व १८०मध्ये पिसा रोमन साम्राज्यात सामील केले गेले. त्या काळातील इटालीतील मोठी व्यापारी शहरे ऑस्टीया आणि फ्लोरेन्स यांना जवळचा समुद्र किनारा पिसा येथीलच असल्यामुळे पिसामधील बंदराचा विकास केला गेला. पुढच्या काळात फ्लोरेन्स आणि जिनोआ या शहरांची व्यापारामुळे जसजशी भरभराट होऊ लागली तसतशी भरभराट पिसा बंदर आणि शहराचीही झाली. इ.स. ३१३मध्ये पिसा शहरात ख्रिश्चन धर्माचा शिरकाव होऊन थोडय़ाच काळात सर्व शहर ख्रिश्चन झाले, बिशपची नियुक्ती झाली. पिसाचा सुपीक प्रदेश व बंदरामुळे मिळणारे उत्पन्न यामुळे अकराव्या शतकात पिसाची आíथकदृष्टय़ा चांगलीच भरभराट झाली. इटालीतील व्हेनिस, जिनोवा या भरभराट झालेल्या तत्कालीन सागरी प्रजासत्ताकांच्या जोडीला एक संपन्न शहर म्हणून पिसाची ओळख अकराव्या शतकात झाली.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

मीठ पचवणाऱ्या वनस्पती

खाजणवनातील वनस्पतीव्यतिरिक्त अनेक अशा वनस्पती आहेत की, त्या नेहमी मीठ खाऊन पचवतात. सागरकिनारी असलेल्या वालुकामय जमिनीत अनेक खुरटी, पसरत वाढणारी झुडपे दिसतात. ही छोटी-मोठी झुडपे सर्वसकट ‘माचुळ’ म्हटली जातात. यातसुद्धा सिसुवियम, अथ्रेक्निमम ही मोठय़ा प्रमाणात असतात. यांची विशेषता म्हणजे त्यांची जाड, पुष्ट, गुबगुबीत-मांसल पाने. पान चिरले तर पाण्याने ओथंबणारा गर बाहेर पडतो. या गराचा खारेपणा भोवतालच्या पाण्यापेक्षा जास्त असल्यामुळे ही झाडे पाण्याच्या काठावर जगू शकतात. सुएडा आणि अथ्रेक्निमम यांच्या फांद्या कठीण असतात, तर सिसुवियमच्या मांसल असून तांबडसर-गुलाबी रंगाच्या असतात. वाळूत पसरटपणे वाढणाऱ्या धाव-फांद्यांवर अनेक मुळे फुटलेली असतात. या मुळांमुळे ही छोटी झुडपे पाण्यांच्या लाटामुळे वाहून जात नाहीत, उलट वाळूला स्थर्य देतात. लहानसहान कृमी-कीटकांना थारा देतात, अन्न पुरवतात. वालुकामय परिसंस्थेतील अन्नसाखळीस हातभार लावतात.

सुएडाची आणि सिसुिवयमची पाने धुऊन, त्यात दही मिसळून तयार होणारी चविष्ट कोिशबीर किनारी खेडय़ातल्या रहिवाशांचे आवडते तोंडी लावणे असते. तुम्ही त्यांचे पाहुणे असाल तर तुमच्या थाळीत ही कोिशबीर विशेष (डेलिकसी) म्हणून वाढली जाईल.

सागरकिनाऱ्याचा तिसरा प्रकार असतो खडकांचा. या ओल्या लाटांनी धुतल्या जाणाऱ्या दगडांवर अनेक प्रकारची शेवाळे वाढतात. या महत्त्वाच्या वनस्पती प्रकाराबद्दल सविस्तर वेगळा लेख लिहिला जाणार आहे, म्हणून येथे फक्त उल्लेख केला आहे.

भरतीच्या लाटांच्या पलीकडे जमिनीवर जी झाडे वाढतात त्यांना तिवर-सहकारी मॅनग्रोव्ह असोसिएट्स म्हणतात. ही झाडे जरी अनेक प्रकारची असली तरी त्या सर्वाना दोन ठिकाणचे मीठ सहन करण्याची क्षमता असावी लागते. एक म्हणजे सागर-सान्निध्यामुळे जमिनीतील जास्त प्रमाणात असलेले क्षार आणि दोन- समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याबरोबर येणारे हवेतील मीठ-क्षार. सर्व प्रकारच्या झाडांना अशी परिस्थिती सहन होत नाही. ज्यांना सहन होते ती अनेक प्रकारची झाडे आहेत- साल्वाडोरा, भेंड, कारंज, समुद्रफळ, करंजवेल, आयपोमिया क्रिस्ताता, दायोस्कोरिया, उंडी, अक्रोस्तीचींअम (नेचे) या सर्व वनस्पतींमध्ये खाऱ्या हवामानात तग धरून वाढण्याची क्षमता असते.

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org