‘प्रिन्स्टनचा प्रज्ञावंत’ हा गिरीश कुबेर यांचा ‘लोकरंग’ मधील (९ ऑक्टोबर) लेख वाचला. प्रिन्स्टनसारख्या स्थळी प्रकांडपंडित अर्थतज्ज्ञाबरोबर झालेल्या चर्चेतील अनेक मुद्दे खोलात विचार करायला लावतात. तसा तो केल्यास अर्थविकासाची गुंतागुंत सोडवण्याचा मार्ग सैद्धांतिक पातळीवरही आपल्याकडे नाही याची खात्री पटते.

‘खरं संकट आहे ते मक्तेदारीचं. स्पर्धेशिवाय अर्थव्यवस्थेचा विकास, प्रगती होऊ  शकत नाही,’ हे दीक्षितसरांचं म्हणणं खरं आहे. परंतु कुठलीही स्पर्धा गती वाढवतेच. ती गती धावण्याची असेल, उद्योगविस्ताराची असेल, नाहीतर नफा वाढवण्याची असेल. जीवघेण्या स्पर्धेत ज्याची गती मंदावेल तो भक्ष्यस्थानी असणार हे ठरलेले असते. ‘अंतिमत: स्वच्छ, अभ्रष्ट सरकार आणि व्यवस्था ही आपल्या हिताचीच आहे, हे एकदा लक्षात आलं की माणसं त्यासाठी धडपडू लागतात..’ हे मतही अगदी खरं आहे. परंतु ‘अंतिमत: म्हणजे नक्की कधी?’ हा कळीचा प्रश्न आहे. जीवघेण्या स्पर्धेत आजचा दिवस कसा निभवायचा, याचीच विवंचना सर्वाना भेडसावते. अशा परिस्थितीत ‘अंतिमत:’ सर्वाच्याच हिताचे काय आहे, हे कळले तरी वळणार कसे? ‘अंतिमत:’मध्ये अभिप्रेत असलेला काळ येईपर्यंत आपण अस्तित्वात असू की नाही याचीच जर स्पर्धेमुळे शाश्वती नसेल, तर ‘आजचे’ हित ज्यामध्ये आहे तोच मार्ग चोखाळला जाणार. मग भले तो कितीही अस्वच्छ, भ्रष्ट असला, तरीही. स्पर्धेतही स्वच्छ मार्गच धरणे भाग पडेल अशी चोख व्यवस्था ज्या सत्ताधाऱ्यांनी राबवावी अशी अपेक्षा असते, त्यांनाही जीवघेण्या स्पर्धेतूनच तर सत्तेत यावे लागते. मग तेही अंतिमत: हिताचे काय, याचा विचार सोडून ‘आज’चाच विचार करणार!

स्पर्धेशिवाय विकास नाही आणि स्पर्धेमुळेच ‘अंतिमत: हितकारक’ गोष्टींना सर्वाकडूनच तिलांजली- असा हा ‘डिलेमा’ सर्व स्तरांवर आहे. ‘ऐहिक प्रगती वेगात झाली तरी सुख हरवले’ असे का होते, हे यातून समजते आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सैद्धांतिक स्वरूपातसुद्धा आपल्यासमोर नाही, ही जाणीव होते. ‘प्रिझनर्स डिलेमा’चा सिद्धांत वाचताना ‘जग हे बंदिशाळा’ या गदिमांच्या ओळी आठवतात. आपणही ‘डिलेमामध्ये असलेले प्रिझनर्स’च आहोत, हे लेख वाचून जाणवते.

– प्रसाद दीक्षित, ठाणे 

दीक्षितांचे मोठेपण

‘प्रिन्स्टनचा प्रज्ञावंत’ हा लेख वाचून काही आठवणी जाग्या झाल्या. अविनाश दीक्षित हे गिरगावातल्या आर्यन शाळेचे एक हुशार विद्यार्थी. एस. एस. सी. परीक्षेत ते शाळेतून पहिले आले होते. त्यामुळे त्यांचे नाव त्यांच्यानंतरच्या वर्गातील आम्हा सर्व मुलांना माहीत होतेच. पुढे  त्यांना मुंबई विद्यापीठाच्या बी. एस्सी. परीक्षेत गणित विषयात ६०० पैकी ६०० गुण मिळाले आणि हा विक्रम केल्याबद्दल शाळेने १९६३ साली त्यांचा सत्कार केला होता. तेव्हाच त्यांची पुढील कारकीर्द उज्ज्वल असणार याची सर्वाना खात्री पटली होती. दीक्षितसरांच्या घराण्यातच प्रज्ञावंतांची आणि विशेषत: गणित व विज्ञान विषयांच्या अभ्यासकांची परंपरा आहे. त्यांचे पणजोबा शंकर बाळकृष्ण दीक्षित हे सुप्रसिद्ध खगोलगणिती होते. त्यांचा ‘भारतीय ज्योति:शास्त्र’(१८९७) हा प्राचीन भारतीय खगोलशास्त्रावरील ग्रंथ विद्वन्मान्य आहे. त्यांचे वडील कमलाकर दीक्षित हे पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक. मुंबईच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मध्ये त्यांनी अध्यापन केले. प्रा. अविनाश दीक्षित यांना भारत सरकारने २०१६ चा पद्मविभूषण किताब देऊन त्यांचा गौरव केला याचा आनंद वाटला होता. या लेखामुळे त्यांचे मोठेपण अधिक विस्ताराने समजले.

– श्रीकांत लिमये, मुंबई

संशोधनाबाबत प्रचंड अंधार

‘प्रिन्स्टनचा प्रज्ञावंत’ लेख वाचला. अमेरिका, त्यांचे राजकारण याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या संस्कृतीबद्दल आपल्याला नेहमीच आकर्षण वाटत आलेलं आहे. तेथील ज्ञानाधिष्ठित व्यवस्था, वाचनसंस्कृती, तिथलं समृद्ध साहित्य हे सगळं भव्यच आहे. पण एवढा श्रीमंत देश, त्यात भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे खासगी कंपन्या, त्यांचं अजब ‘वर्क कल्चर’, त्यासोबत चंगळवादही. अशा व्यवधानांत हे लोक वाचनासाठी वेळ काढतात तरी कसा आणि कधी? आपल्याकडे तर  वाचन, व्यासंग हे युवकांसाठी नसतातच असं वाटतं. युवकांनी वाचलंच फार फार तर प्रेरणादायी साहित्य किंवा चेतन भगत, रविंदर सिंग आणि तत्सम लेखकांची पुस्तकं. याशिवाय सांगायचे झाल्यास स्वामी, श्रीमानयोगी, मृत्युंजय, ययाती या कादंबऱ्या, तसेच कुसुमाग्रज, वपु यांच्यासोबत पाउलो कोएलो वगैरे.. बस्स.. एवढंच.

आपल्याकडे अर्थशात्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांमधील संशोधनाबाबत तर प्रचंड अंधारच आहे. या विषयांतले अगदी हुशार विद्यार्थी मोठय़ा संख्येने लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये आयुष्याची अत्यंत महत्त्वाची वर्षे गुंतवीत आहेत. अर्थात त्याला बरीच कारणं आहेत. पण मग या विषयांचं काय? किंवा समाजाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर केलेल्या खर्चाचं काय, हे प्रश्न उरतातच.

– निरंजन कदम, यवतमाळ</strong>