mailsholay‘‘शोले’चे अनाकलनीय प्रस्थ’ हे ‘लोकरंग’ (६ सप्टेंबर) मधील प्रसाद दीक्षित यांचे पत्र चिंतनीय आहे. याबाबतीत माझे आकलन पुढीलप्रमाणे नोंदवितो.
‘शोले’च्या वेळची सिनेरसिकांची पिढी आज निवृत्त जीवन जगत आहे. त्याच्या पुढची पिढी आज मध्यमवयीन असावी (मी या पिढीचा प्रतिनिधी आहे) व त्यापुढची पिढी म्हणजे आजचे विद्यार्थी. माझा शाळकरी मुलगा या पिढीचा प्रतिनिधी आहे. माझ्या निरीक्षणानुसार या तिन्ही पिढय़ांना ‘शोले’ने झपाटले आहे. आजही हा चित्रपट विविध चॅनेल्सवर मधूनमधून दाखविला जातो. याचा अर्थच असा की, आजही ‘शोले’चे मनोरंजन मूल्य कायम आहे. घोडय़ावर बसून व हाती पिस्तुल व बंदूक घेऊन दरोडेखोरी करणारे डाकू केव्हाच इतिहासजमा झाले. असे असताना हा डाकूपट मात्र आजही किमान तीन पिढय़ांच्या भावविश्वाचा एक महत्त्वाचा भाग होऊन राहिला आहे, हे अनाकलनीय असले, तरी सत्य आहे.
‘शोले’मधील मनोरंजनाचा मसाला अन्य अनेक चित्रपटांप्रमाणेच असला तरी त्यात असे काहीतरी आहे, जे तो चित्रपट तोंडपाठ होईपर्यंत पाहिल्यानंतरही पुन: पुन्हा पाहण्यासाठी उद्युक्त करते. मनोरंजनाचा टिपिकल मसाला ठासून भरलेल्या अनेक महान चित्रपटांमध्ये हे रीपिट मूल्य नव्हते किंवा तेवढय़ा प्रमाणात नव्हते असे वाटते.
‘शोले’ हा असा एकमेव चित्रपट आहे, ज्यातील संजीवकुमार, अमिताभ बच्चन, जया बच्चन व सचिन वगळता मुख्य कलाकारांपासून ते एका दृश्यापुरते असणारे असे सर्व कलावंत आजही ‘शोले’मधील त्यांच्या त्यांच्या पात्राच्या नावानेच प्रसिद्ध आहेत. मॅकमोहनचं एक उदाहरण पुरेसं आहे. अन्य शेकडो चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करणारा हा कलावंत ‘शोले’मध्ये एका टेकाडावर बसून राहण्यापलीकडे काहीही करत नाही व क्लायमॅक्सला एकाच गोळीत त्याचा कारभार संपतो. पण स्वत: मॅकमोहन यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटायचे, की जेथे जाऊ तिथे त्यांची ओळख ‘शोले’मधला सांबा अशीच करून दिली जायची. हे आहे ‘शोले’चे एक वैशिष्टय़. जे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अन्य चित्रपटांतील पात्रांच्या बाबतीत अनुभवास आलेले नाही. पटकथेवरची मेहनत, जबरदस्त संवाद, पात्राची अचूक निवड व आर.डी. बर्मन यांचे विलक्षण प्रभावी पाश्र्वसंगीत हे यामागचे रहस्य असू शकेल. अन्यथा ‘अरे ओ सांबा’ किंवा ‘कितने आदमी थे?’ या संवादामध्ये अविस्मरणीय असे कहीच नाही.
सारांश काय, तर अन्य अनेक चित्रपट हे मनोरंजनाचे काही ना काही मसाले विकणाऱ्या दुकानांप्रमाणे होते, तर ‘शोले’ हे मात्र मनोरंजनाच्या सर्वच मसाल्यांचे डिपार्टमेंटल स्टोअर आहे आणि हीच गोष्ट त्याचे प्रस्थ माजविण्यास कारणीभूत ठरली आहे. एकदम नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारा माझा मुलगासुद्धा जेव्हा ‘शोले’ लागला की बाकीचे मनोरंजन विसरून जातो, तेव्हा ‘शोले’चे गारूड पुढच्याही काही पिढय़ा ओसरणार नाही असे वाटू लागते.
जाता जाता एक दुरुस्ती अशी की प्रसाद दीक्षित यांनी लिहिल्याप्रमाणे ‘वादे अक्सर टूट जाते है, कोशिशें कामयाब होती है’ हा आशयपूर्ण संवाद ‘दीवार’मधील नसून ‘शराबी’ या चित्रपटातील आहे.
– मंदार रामदास वैद्य,
डोंबिवली (पूर्व)

‘शोले’ ग्रेटच!
‘‘शोले’चे अनाकलनीय प्रस्थ’ हे पत्र ‘लोकरंग’ (६ सप्टेंबर) वाचले. भारतात जितक्या भाषांमध्ये चित्रपट निर्माण होतात त्या सगळ्यांत मिळून एकमेव ‘शोले’ला जे ‘न भूतो न भविष्यती’ यश मिळाले, त्यामुळे आकसाने अथवा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून हे पत्र लिहिलेले स्पष्ट दिसते. चित्रपटाचे नावच ‘शोले’ (धगधगत्या ज्वाळा) असे असल्याने त्यात क्रौर्य अपरिहार्यच आहे; कारण त्या ज्वाळा थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटविलेल्या शेकोटीच्या नाहीत, तर सूडाच्या आहेत. एका दरोडेखोराने पोलीस अधिकाऱ्यावर उगवलेला सूड आणि नंतर जबर जायबंदी असूनही पोलीस अधिकाऱ्याने घेतलेला बदला. ‘शोले’ ची कथा केवळ चार ओळींची, पण प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारी पटकथा तीन तासांची आहे. ठाकुर, जय, वीरू, बसंती, राधा आणि गब्बर ही सहा प्रमुख पात्रे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सहाही भूमिकांना समान न्याय दिला गेला आहे. एकही कमी-जास्त नाही. याचे श्रेय जाते संकलक माधवराव शिंदे यांच्याकडे. पत्रलेखकाने यातील क्रौर्यावर जो आक्षेप घेतला आहे तो अनाठायी आहे. उलट गब्बरने ठाकुरच्या नातवाच्या (अलंकार) डोक्याच्या उडवलेल्या चिंधडय़ा किंवा गब्बरने ठाकुरचे खांद्यापासून तोडलेले हात हे हृदयात धडकी भरवविणारे प्रसंग केवळ संजीवकुमारच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून तसेच डोळ्यांत तरळणारे अश्रू व अंगावरील शाल खाली पाडून सूचित केले आहेत. संजीवकुमारच्या हात नसलेल्या ठाकुरच्या असामान्य अभिनयाबद्दल किंवा इतरांच्या अभिनयासंबंधी पत्रात कौतुकाचा शब्द नाही. ‘गब्बर’ हा चाकोरीबाह्य दरोडेखोर आहे. तो भोजपुरी-हिंदी भाषांची सरमिसळ असलेली भाषा भोजपुरी ढंगात बोलतो. त्याचा वेश लष्करी आहे आणि तो तंबाखूही मळतो. हे भूमिकेतील नावीन्य होते. त्याचा ‘कितने आदमी थे’ हा ‘फालतू’ संवाद ‘मेरे पास माँ है’ हा दर्जेदार संवाद लिहिणाऱ्या सलीम-जावेद यांच्याच लेखणीतून उतरला आहे, यावर काय म्हणायचे आहे? बसंती टांगेवाली आहे; नाचणारी नाही. गब्बर तिला बळेच नाचायला लावतो. त्या गीताला ‘आयटम’ म्हणणे म्हणजे हद्द झाली. यातील विक्षिप्त जेलरसारखे पात्र इंग्रजी चित्रपटात पाहावयास मिळते. सूरमा भोपालीचे पात्रही लोभसवाणे आहे. ‘शोले’च्या ‘उरलेल्या’ वरून काढलेला ‘कर्मा’ किंवा हल्लीच्या ‘सिंघम’ किंवा ‘दबंग’सारख्या केवळ एका व्यक्ति रेखेभोवती फिरणाऱ्या व आतोनात हिंसा असणाऱ्या टुकार चित्रपटांचे वारेमाप कौतुक होते; पण ‘शोले’सारख्या चित्रपटतंत्राच्या प्रत्येक अंगात तावूनसुलाखून निघालेल्या व मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटावर आजही अशी बिनबुडाची टीका होते, हे निव्वळ दुर्दैव होय.
– अनिल तोरणे, तळेगाव दाभाडे.

२० सप्टेंबरच्या ‘लोकरंग’मधील ‘..त्यांसी म्हणावे आपुले!’ या मकरंद अनासपुरे यांच्या लेखाचे शब्दांकन प्रशांत मोरे यांनी केले होते.