महिन्याच्या सुरुवातीला दोन वेळा पडून गेलेला जोरदार पाऊस, त्यानंतर झालेली उघडीप आणि अधूनमधून पडून जाणारी पावसाची एखादीच सर अशा वातावरणात जुलैत शहरात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार चालू महिन्यात आतापर्यंत २५६ डेंग्यूसदृश रुग्ण सापडले आहेत.

पुण्यात गतवर्षीही जुलैपासून डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढू लागली होती, परंतु ऑगस्टपर्यंत डेंग्यूसदृश रुग्ण कमीच राहिले होते. यंदा मात्र जूनपासूनच रुग्णसंख्या वाढू लागली.

चालू वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत ५४४ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले असून जूनमध्ये १४० डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली होती.

याशिवाय डेंग्यूची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ येऊन निश्चित डेंग्यू रुग्ण ठरवले गेलेले ९३ रुग्ण जानेवारीपासून सापडले असून जून व जुलैमध्ये त्यांची संख्या अनुक्रमे २५ व १४ आहे.