कधीकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात आता आलिशान ‘मर्सिडीज बेंझ’ ने जम बसवला आहे. दहा वर्षांपूर्वीपर्यंत केवळ दिल्ली आणि मुंबईतच एकवटलेले महागडय़ा लग्झरी मोटारींचे मार्केट आता पुण्यातही हातपाय पसरत आहे. पुण्याच्या रस्त्यांवर सध्या तब्बल ३ ते ४ हजार मर्सिडीज मोटारी धावत असून, देशातील या कंपनीच्या बाजार हिश्शापैकी ६ ते ८ टक्के वाटा पुण्याचा आहे. विशेष म्हणजे देशातील जवळजवळ सर्व मोटारी पुण्यातील चाकण प्रकल्पात तयार झाल्या आहेत.
मर्सिडीज बेंझ इंडियाच्या ‘ह्य़ूमन रीसोर्स अँड कॉर्पोरेट अफेअर्स’ विभागाचे संचालक सुहास कडलसकर यांनी ही माहिती दिली.  कंपनीचे देशातील व्यवस्थापकीय संचालक एबरहार्ड केर्न यांच्या हस्ते पुण्यातील चाकण प्रकल्पात देशातील पन्नास हजाराव्या मर्सिडीज मोटारीचे अनावरण करण्यात आले. मर्सिडीजची ‘सी क्लास ग्रँड एडिशन’ ही मोटार या वेळी सादर करण्यात आली. चाकण प्रकल्पाचे अध्यक्ष पियूष अरोरा या वेळी उपस्थित होते. १९९४ पासून आतापर्यंत कंपनीने देशात ५० हजार मोटारी विकल्या आहेत. यातील ‘मर्सिडीज सी क्लास’ ही श्रेणी सर्वाधिक लोकप्रिय ठरली असून केवळ या श्रेणीच्या तब्बल १९ हजार मोटारी देशात खपल्या आहेत. या मोटारीच्या नवीन ग्रँड एडिशनमधील ‘सी २०० जीइ पेट्रोल’ या मोटारीची पुण्यातील एक्स शोरूम किंमत ३६.८१ लाख रुपये तर ‘सी २०० सीडीआय डिझेल’ या मोटारीची किंमत ३९.१६ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

चाकण प्रकल्पात ‘एस क्लास’
मोटारींचे उत्पादन सुरू होणार
केर्न म्हणाले, ‘‘मर्सिडीज ‘एस क्लास’मधील ‘एस- ५००’ या मोटारीचे उत्पादन मार्च- एप्रिलच्या आसपास चाकण प्रकल्पात सुरू करण्यात येईल. या मोटारीला असलेली मागणी मोठी असून तिच्या पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या अशा दोन्ही आवृत्त्या येथे अनुक्रमे बनवल्या जातील.’’ एस ५०० ही मर्सिडीजच्या अत्यंत महागडय़ा मोटारींपैकी एक असून ती देशात बनवली जाणारी पहिली ‘८ सिलिंडर’ इंजिन असलेली मोटार ठरणार आहे.  

चाकण प्रकल्प का लक्षवेधी?
– प्रकल्पात कंपनीची ८५० कोटी रुपयांची गुंतवणूक
– सध्या या प्रकल्पात ‘सी क्लास’, ‘इ- क्लास’, ‘एमएल क्लास’ आणि ‘जीएल क्लास’ या मॉडेल्सची जोडणी केली जाते.
– ‘एस क्लास’ मोटारीची जोडणी मार्च-एप्रिलच्या सुमारास सुरू होणार
– ‘हेलिपॅड अॅक्सेस’
ज्या ग्राहकांना हेलिकॉप्टरने येऊन मोटारी पाहायच्या आहेत त्यांच्यासाठी प्रकल्पात हेलिकॉप्टर उतरवण्याची सुविधा
– ‘ऑफ रोड ट्रॅक’
मोटारीची ‘टेस्ट ड्राईव्ह’ घेण्यासाठी खास बनवलेला ट्रॅक

मर्सिडीजची देशातील वीस वर्षे

मर्सिडीज मोटारींचा देशातील गेल्या वीस वर्षांतील खप पाहता पहिल्या १४ वर्षांत २० हजार मोटारी खपल्या होत्या. त्यांनतरच्या २ वर्षांत १० हजार मोटारींची विक्री झाली. तर गेल्या ३ वर्षांत आणखी २० हजार मोटारींची विक्री झाली आहे.

 कालावधी        खपलेल्या एकूण मोटारी
१९९४ ते २००८        २० हजार
२००८ ते २०१०        १० हजार
२०१० ते २०१४        २० हजार

नवीन कोणती मॉडेल्स येणार ?
चालू वर्षी कंपनीतर्फे मोटारींची दहा नवीन मॉडेल्स देशात सादर करणार असल्याचे केर्न यांनी सांगितले. यात असलेली
महत्त्वाची मॉडेल्स अशी-
– ‘सीएलए ४५ एएमजी’
– ‘एमएल ५०० गार्ड’ (हाय प्रोटेक्शन एसयूव्ही)