पुणे ते नागपूरचे भाडे १५०० वरून ३५०० रुपयांवर

दिवाळीच्या हंगामात तिकिटांची दरे भरमसाठ वाढवण्यात येत असल्याने जवळपास महिनाभर आधीच तिकीट बुकिंग करणाऱ्यांचीही खासगी बस वाहतूकदारांनी लूट सुरू केली आहे. प्रवासाचे महिनाभर आधी नियोजन करणाऱ्यांकडूनही सध्याच्या दरांच्या दुप्पट भाडे वसूल केले जात असून मागणी वाढल्यास त्यात आणखी भर टाकण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातून सर्वाधिक मागणी असलेल्या पुणे- नागपूर प्रवासासाठी ‘स्लीपर कोच’ प्रकारातील बसचे भाडे पंधराशे ते सोळाशे रुपयांवरून थेट तीन ते साडेतीन हजार रुपयांवर नेण्यात आले आहे.

उन्हाळ्याच्या सुटीबरोबरच दिवाळीच्या सुटीमध्येही मूळ गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. दिवाळी ते डिसेंबरच्या अखेपर्यंत मोठय़ा प्रमाणावरील प्रवाशांकडून प्रवासाचे नियोजन करण्यात येते. मागणी असलेल्या याच काळात खासगी वाहतूकदार बसच्या भाडय़ामध्ये वाढ केली जाते. यंदाही वाहतूकदारांकडून त्याचीच री ओढली जात आहे. इतर वेळेला कोणत्याही दिवसाचे बसचे आरक्षण प्रवाशांना दिले जाते. मात्र, दिवाळीच्या काळातील आरक्षण जाणीवपूर्वक थांबविले जाते. या वेळीही नेहमीच्या दरामध्ये बसचे आरक्षण मागणाऱ्यांना ते नाकारण्यात येत होते. मागील आठवडय़ापासून सर्वच वाहतूकदारांनी दिवाळीच्या सुटीतील आरक्षण सुरू केले असून, मनमानी भाडेवसुलीने लूट केली जात आहे.

दिवाळीच्या सुटीमध्ये विदर्भाकडे व विशेषत: नागपूरकडे जाण्यासाठी प्रवाशांची सर्वाधिक मागणी असते. दिवाळी ते डिसेंबर- जानेवारीपर्यंत प्रामुख्याने पर्यटनाला जाण्यासाठी खासगी प्रवासी बसकडे प्रवासी वळतो. या काळात गोव्याकडे जाणाऱ्या गाडय़ांना मागणी असते. सद्य:स्थितीत नागपूरला जाण्यासाठी दिवाळीच्या काळातील ‘स्लीपर कोच’ प्रकारातील बसच्या आरक्षणाला जोरदार मागणी आहे. त्याचाच फायदा घेत प्रत्येक दिवसाला या बसच्या भाडय़ामध्ये वाढ सुरू आहे. पुणे- नागपूर प्रवासासाठी इतर वेळेला पंधराशे ते सोळाशे रुपये भाडे आकारले जाते. मात्र, आता हे भाडे तीन ते साडेतीन हजारांपर्यंत आकारण्यात येत आहे. ही लूट थांबविण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

खासगी बसभाडय़ावरही र्निबध हवेत

प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वारण्यात येणाऱ्या खासगी बसला परवानगी देणे, बस सुस्थितीत असल्याची तपासणी करून प्रमाणपत्र देणे आदी कायदेशीर बाबी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासल्या जातात. मात्र, खासगी बससाठी ठराविक अंतराला किती भाडे असावे, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. वाहतूकदारांमधील अंतर्गत स्पर्धा व प्रवाशांची मागणी यावरच वाहतूकदार प्रवासाचे भाडे ठरवतो. त्यामुळे मागणीच्या काळात प्रवाशांची लूट होते. त्यामुळे खासगी बसच्या भाडय़ावरही र्निबध आणावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

वाहतूकदारांकडून समर्थन

मागणीच्या काळामध्ये प्रवासी भाडय़ामध्ये केल्या जाणाऱ्या भाडेवाढीचे वाहतूकदारांकडून मात्र वेगवेगळी कारणे देऊन समर्थन करण्यात येते. याबाबत खासगी वाहतूकदाराच्या एका व्यवस्थापकाने सांगितले की, बसचा देखभाल व इतर शासकीय खर्च मोठा असतो. बस बंद असो किंवा सुरू असो, शासनाचे सर्व कर भरावेच लागतात. मागणी नसल्याच्या काळात कमी प्रवासी असले, तरी बस सोडली जाते. त्यातून होणारा तोटा मागणीच्या काळात भरून काढला जातो.