जयराम कुलकर्णी ज्येष्ठ अभिनेते

महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याच्या स. प. महाविद्यालयामध्ये आल्यानंतर श्रीकांत मोघे, शरद तळवळकर या मित्रांसोबत माझी अभिनयाची गाडी खऱ्या अर्थाने सुरू झाली. नाटक, अभिनय हा माझा आवडता छंद, त्यामुळे तेव्हा वाचनाकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. प्रत्यक्ष रंगभूमीवर किमया दाखवायची हा एकच ध्यास तरुणपणी माझ्या मनात होता. पण, १९५६ मध्ये आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये नोकरी सुरू झाली आणि वाचनाकडे मी आपोआपच वळू लागलो. व्यंकटेश माडगूळकर, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते द. मा. मिरासदार, आनंद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांशी आकाशवाणीच्या नोकरीमध्ये संबंध आल्याने त्यांचे लेखन आणि माझे वाचन असा प्रवासच सुरू झाला.

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
Fire Breaks Out at Atharva Agrotech Industry Project in Buldhana near khamgaon midc
खामगाव ‘एमआयडीसी’तील ‘अथर्व ॲग्रोटेक’ला भीषण आग, लाखोंची हानी
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू

सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील तेव्हा अवघे अकराशे लोकवस्ती असलेले आंबेजवळगे हे माझे गाव. गावामध्ये शिक्षणाची सोय तशी जेमतेमच. त्यामुळे शाळेची पुस्तके आणि फारतरं एखादे वर्तमानपत्र एवढाच काय तो, माझा आणि वाचनाचा संबंध. शाळेत असल्यापासूनच मला अभिनयाची आवड होती. त्यामुळे सहावी-सातवीमध्ये असताना शाळेत ‘मोरुची मावशी’ या नाटकात मी मावशीचे काम केले; तोच माझ्या आयुष्यातील रंगभूमीवरचा पहिला प्रवेश. स. प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका मी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच.. जयराम कुलकर्णी असा शिक्का माझ्यावर बसला. त्या वेळी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात झाली असल्याने नाटकांचे वाचन हळूहळू सुरू झाले होते.

माझा वाचनप्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला, तो आकाशवाणीमध्ये नोकरीला लागल्यानंतरच. व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून माझी नेमणूक होती. त्यामुळे त्यांच्या लेखनाशी माझा जवळचा संबंध आला. त्यांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीचे वाचन मी कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत होतो. कादंबरीतील कोणते पात्र कोणी करायचे यापासून ते सराव आणि ध्वनिमुद्रणापर्यंतचे काम माझ्याकडेच होते. तात्यांचा सहायक असल्याने कामाच्या निमित्ताने त्यांच्या घरी अनेकदा जायला लागायचे. प्रभात रस्त्यावरील त्यांच्या घरी गेल्यानंतर अनेकदा ग. दि. माडगूळकर यांच्याशी भेट होत असे. त्यामुळे हळूहळू त्यांचीही पुस्तके वाचायला सुरुवात झाली.

आकाशवाणीच्या कार्यक्रमांमध्ये ग्रामीण बोली बोलणे, ही माझी महत्त्वाची भूमिका. कृष्णराव सपाटे आणि मी, असे आम्ही दोघे ग्रामीण भाषेशी संबंधित सगळेच कार्यक्रम करीत होतो. तर अनेकदा बालोद्यान, बालगोपाळ अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. आकाशवाणी हे तेव्हा एकच माध्यम. त्यामुळे गृहिणींसाठी सादर केलेल्या कार्यक्रमांनादेखील मोठा प्रतिसाद मिळत असे. लेखिका ज्योत्स्ना देवधर या ‘गृहिणी’ कार्यक्रमामध्ये ‘माजघरातील गप्पा’ सादर करीत. तेव्हा त्यांच्यासोबत काम केल्यामुळे देवधर यांचीही अनेक पुस्तके मी वाचली. त्यांच्या ‘अंतरा’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘पडझड’ या कादंबऱ्यांचा संग्रह माझ्याकडे झाला.

पुलंचे ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे पुस्तक तसे माझ्या अगदी जवळचे. मी त्यांच्याकडेही सहायक म्हणून काम केले. त्या वेळी ‘नारायण’ ही भूमिका मी करावी, असा आग्रह पुलंनी कार्यक्रम संयोजकांकडे धरला होता. त्यामुळे ‘व्यक्ती आणि वल्ली’पासून पुलंच्या पुस्तकांचा माझा वाचनप्रवास सुरू झाला. आकाशवाणी कलाकार म्हणून मला सगळीकडे आदर मिळत असे.

‘आपली माती, आपली माणसं’ या कार्यक्रमाकरिता दर महिन्याला खेडेगावात दौरा ठरलेला. तेव्हा दोनशे-तीनशे लोक एकाच वेळी रेडिओ ऐकत असल्याचे चित्र पाहून अनेकदा अप्रूप वाटायचे. खत आणि शेतीविषयक संवाद लिहिण्याकरिता द. मा. मिरासदार आणि आनंद यादव यांसारख्या दिग्गजांसोबतही मी दोन-तीन वष्रे काम केले. त्यांनी लिहायचे आणि मी वाचनाद्वारे श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचे. यामुळे माझ्या वाचन संग्रहात आणखी दोन साहित्यिकांची पुस्तके जोडली जात होती.

या लेखकांनी लिहिलेले वाचून वाचून ग्रामीण जीवनाविषयी ज्ञानाचा इतका मोठा साठा मिळाला, की अनेकदा मी मनाचे संवादही कार्यक्रमात सादर करीत असे. परंतु अर्थातच ते विषयाला जोडून आणि आकाशवाणीच्या नियमांना धक्का न लावता. मराठी सिनेदिग्दर्शक अनंतराव माने यांनी मला पहिल्यांदा चित्रपटात काम दिले. कोल्हापूर आणि मुंबई येथे चित्रीकरण असल्याने नोकरीतील रजा संपायच्या. त्यामुळे १९७० च्या सुमारास मी आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा दिला.

आकाशवाणीमुळे त्या वेळचे मोठ-मोठे कलाकार आणि साहित्यिकांशी माझ्या ओळखी झाल्या होत्या. त्यामुळे चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम या समीकरणानेच प्रत्येक जण माझ्याकडे पाहू लागला. सुरूवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका मला चित्रपटांतून मिळाल्या. परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका मी साकारल्या. या दरम्यान चित्रपटांचे चित्रीकरण नसलेल्या फावल्या वेळात दिवाळी अंक आणि गो. नी. दांडेकर यांची दुर्ग भ्रमणगाथा, गड-किल्ले यावरची पुस्तके मी वाचत होतो. वाचनाने माझ्या ज्ञानात भर पडत असली, तरी त्यातून मिळणारी कमालीची ऊर्जा माझ्यासाठी महत्त्वाची होती.

चित्रपटातील अभिनय आणि वाचनाची सांगड घालणे, तसे कठीणच. पुण्या-मुंबईसह कोल्हापूरलाही चित्रीकरणासाठी जायचे आणि रुपेरी पडद्यावर अभिनयातून स्वत:ची भूमिका प्रेक्षकांसमोर साकारायची, यात काही वेगळाच आनंद मिळत होता. परंतु तरीही मिळेल त्या वेळात ‘मृण्मयी’, ‘ही श्रींची इच्छा’, ‘माचीवरला बुधा’, ‘मोगरा फुलला’ अशी पुस्तके आणि कादंबऱ्या मी वाचत होतो. माझी सून मृणाल देव-कुलकर्णी हिच्यामुळे गो. नी. दांडेकर आणि वीणा देव यांच्याशी नातेसंबंध होताच. त्यामुळे त्यांची पुस्तकेही आमच्या घरामध्ये नेहमी असत. तर मृणालमुळे आजही अनेक वेगवेगळी पुस्तके, मासिके आणि कादंबऱ्या घरामध्ये अगदी जवळच्या नातेवाइकांसारख्या दररोज भेटायला येतात. त्यामुळे अभिनयाप्रमाणे पुस्तकांशी गट्टी जमायला कधीच वेळ लागला नाही आणि यापुढेही लागणार नाही.