विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चात रविवारी सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.

महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, उदयनराजे भोसले यांची उपस्थिती मोर्चात होती.

मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी हा मोर्चा मराठा समाजाच्या हक्कासाठी असल्याचे सांगितले. मराठा समाजाच्या सर्व मागण्या रास्त आहेत. या मागण्या मान्य करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे, असेही ते म्हणाले. राज्य मंत्रिमंडळातील विजय शिवतारे, आमदार जगदीश मुळीक, तसेच सुरेश गोरे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, भाई जगताप, दिलीप वळसे-पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे हे विधानभवनजवळ मोर्चात सहभागी झाले. मोर्चाच्या दरम्यान, शहराच्या विविध भागांमध्ये स्थानिक नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी यांनीही मोर्चात सहभाग नोंदविला.