भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे गावात भरीव सुधारणा करून त्यास पर्यटन केंद्राचा दर्जा मिळावा, यादृष्टीने प्रयत्न करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही भाजपचे खासदार अमर साबळे यांनी रविवारी पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली. आघाडी सरकारने यासंदर्भात नुसत्याच घोषणा केल्या. मात्र, अंमलबजावणी न झाल्याने गावकऱ्यांच्या तीव्र भाावना आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
साबळे म्हणाले,की सांसद आदर्श ग्राम योजनेत रत्नागिरी जिल्ह्य़ातील आंबडवे गावाचा समावेश आहे. अवघी २५४ लोकसंख्या असल्याने प्रारंभी निकषात ते बसत नव्हते. मात्र, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करून आंबेडकरांच्या या मूळ गावचे महत्त्व निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत मोदींनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री वीरेंद्रसिंह चौधरी यांना सूचना केल्यानंतर, विशेष बाब म्हणून आंबडवेचा योजनेत समावेश झाला. गुरूवारी आपण ग्रामस्थ व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गावच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात येत असून अंतिम मान्यतेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. रूग्णालये, शैक्षणिक सुविधा, निवासस्थाने, बेघरांना घरे, मुबलक पाणीपुरवठा, सक्षम वाहतूक व्यवस्था आदींचा समावेश आराखडय़ात असेल, त्यासाठी २५ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. केवळ आंबडवेचा विकास डोळ्यासमोर न ठेवता समूह ग्रामपंचायतीचा विकास करू. दोन वर्षांत आंबडवे आदर्श मॉडेल झालेले असेल. त्यासाठी सर्वाचे सहकार्य घेऊ. विकासाच्या प्रकल्पांमध्ये लोकसहभाग हवा, गावे स्वयंपूर्ण व्हायला हवीत, अशी मोदींची भूमिका आहे. पत्रकार परिषदेत रघुनंदन घुले, मोहन कदम, अशोक सोनवणे, बाबू नायर, उमा खापरे, महेश कुलकर्णी, बाळासाहेब गव्हाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.