पंधरा किलो चांदी आणि ४५ लाखांचे हिरे; मनेका गांधींकडे ३.४१ किलो सोने, ८५ किलो चांदी

नोटाबंदीनंतर आता नागरिकांकडील सोन्याबाबत जोरदार चर्चा सुरू असताना त्याचप्रमाणे सोन्यात नव्हे, तर ‘गोल्ड बॉन्ड’मध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला जात असताना केंद्रीय मंत्र्यांकडील त्यांनीच जाहीर केलेल्या संपत्तीनुसार,अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडेच तब्बल पाच किलो ६३० ग्रॅम दागिने, १५ किलो चांदी आणि ४५ लाखांचे हिरे आहेत. त्यापाठोपाठ मनेका गांधी यांच्याकडे ३.४१ किलो सोन्याचे दागिने व ८५ किलो चांदी आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडे मात्र साडेचार तोळ्याच्या चार सोन्याच्या अंगठय़ा आहेत.

कॅबिनेट मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी, मनोहर र्पीकर व नजमा हेपतुल्ला यांच्या मालमत्तेचा तपशील जाहीर केलेला नाही. उपलब्ध माहितीनुसार जेटली यांच्याकडे स्वत:चे सर्वाधिक सोन्याचे दागिने आहेत. जेटली यांनी पाच किलो ६३० ग्रॅम वजनाच्या दागिन्यांचा प्रतिग्रॅम २४०९ रुपये दरानुसार या दागिन्यांची १ कोटी ३५ लाख ६२ हजार रुपये किंमत दाखविली आहे. पत्नी संगीता जेटली यांच्याकडे सुमारे ऐंशी तोळ्याचे दागिने, चार किलो चांदी व सुमारे २३ लाखांचे हिरे आहेत.

इतर मंत्र्यांमध्ये उमा भारती यांनी सोने-चांदीची भांडी, देवाचे दागिने मिळून सहा किलो वजनाचे सोने-चांदी जाहीर केले आहे. शहर विकासमंत्री वैंकय्या नायडू यांच्या नावे दागिने, जमीन, मोटार, घर, व्यावसायिक इमारत यापैकी काहीही नाही, मात्र त्यांच्या पत्नीच्या नावे या सर्व गोष्टी आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे २२५ ग्रॅम सोन्याची नाणी आहेत.  ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांच्याकडे कोणताही दागिना नसला, तरी पत्नीकडे मात्र ७० तोळे सोन्याचे दागिने आहेत.

रसायने व खतेमंत्री अनंतकुमार यांचीही स्थिती तशीच असून, त्यांच्या पत्नीकडे ८० तोळे सोने व १० किलो चांदी आहे. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाच लाख ६८ हजारांचे, तर पत्नीकडे १५ लाखांचे दागिने आहेत. परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोने व चांदीचे मिळून ३० लाखांचे दागिने आहेत. वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केवळ १६.३५० ग्रॅम वजनाचे दागिने असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

पुण्यातील ‘सजग नागरिक मंच’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी याबाबत सांगितले, की सोन्यामध्ये गुंतवणूक न करता पैसा शासनाकडे राहण्यासाठी ‘गोल्ड बॉन्ड’ घेण्याचा सल्ला शासनाकडून देण्यात येत आहे. अशा स्थितीत मंत्र्यांनीच त्यांच्याकडे सोन्याचे दागिने ठेवणे कितपत योग्य आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या मालमत्तेचा तपशील उपलब्ध असलेली लिं

http://www.pmindia.gov.in/en/assets-and-liabilities-of-the-union-council-of-ministers-2015-2016