पुणे रेल्वे स्थानकावर पाण्याचे स्वयंचलित यंत्र कार्यान्वित

एक रुपयांचे नाणे यंत्रामध्ये टाका आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळवा.. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी अशा प्रकारची स्वयंचलित यंत्रांची सुविधा गुरुवारपासून सुरू करण्यात आली. या सुविधेत एक रुपयापासून २५ रुपयांपर्यंत स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करून देण्यात येत असून, स्वयंचलित यंत्राबरोबरच विक्रेत्यांकडूनही या सुविधेतील पाणी मिळू शकणार आहे. त्यामुळे स्थानकावर बाटलीबंद पाणी खरेदीसाठी होणारी प्रवाशांची लूट थांबू शकणार आहे.

पुणे स्थानकावर पाणी विक्रीची एकूण सहा स्वयंचलित यंत्र लावण्यात आली आहेत. त्याचे उद्घाटन गुरुवारी पुणे रेल्वेचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय यांच्या हस्ते झाले. अपर व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वाणिज्य व्यवस्थापक मदनलाल मीना, वरिष्ठ अभियंता सुरेश पाखरे आदी प्रमुख उपस्थित होते.

या यंत्राच्या माध्यमातून किंवा विक्रेत्यांच्या माध्यमातून बाटली किंवा बाटलीशिवायही पाणी मिळू शकेल. १ रुपयामध्ये ३०० मि.ली. (बाटलीसह २ रुपये), ३ रुपयात ५०० मि.ली. (बाटलीसह ५ रुपये), ५ रुपयात १ लिटर (बाटलीसह ८ रुपये), ८ रुपयात दोन लिटर (बाटलीसह १२ रुपये), २० रुपयांत पाच लिटर (बाटलीसह २५ रुपये) पाणी प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन विभागाच्या वतीने ही सुविधा देण्यात आली आहे.पाण्याची यंत्र लावल्यामुळे प्रवाशांना स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी कमी दरात उपलब्ध होऊ शकणार आहे. या निमित्ताने प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाल्याचे बी. के. दादाभोय यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.