कार्यकारिणीत अमोल थोरात, बाबू नायर यांचाही समावेश

िपपरी भाजपची रखडलेली शहर कार्यकारिणी चार महिन्यांनंतर जाहीर झाली. मात्र, त्याचे तीव्र पडसाद उमटले. पक्षांतर्गत पातळीवर बराच थयथयाट झाल्याने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना हस्तक्षेप करून कार्यकारिणीत अमोल  तेचोरिणीतील सरचिटणिसांची संख्या सहा झाली आहे.  गटबाजीचा पहिला अध्याय पूर्ण झाला असून आता संघटन सरचिटणीसपदावरून वादाची पुढची पायरी रंगणार असल्याच  संकेत आहेत.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी जवळपास १०० जणांची शहर कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये माउली थोरात, सारंग कामतेकर, संजय मंगोडेकर, प्रमोद निसळ यांची सरचिटणीसपदावर निवड झाली. माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांचे समर्थक अमोल थोरात तसेच लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांचे समर्थक बाबू नायर यांची नावे चर्चेत होती. प्रत्यक्ष कार्यकारिणीत त्यांचा समावेश झाला नाही, त्यावरून पक्षातील वातावरण तापले. थोरात यांनी बरीच आदळआपट केली.

खाडे तसेच पटवर्धन यांनी प्रदेशाध्यक्षांशी संपर्क साधून आपल्या समर्थकांवर अन्याय होत असल्याची व स्थानिक पातळीवर मनमानी कारभार होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यापूर्वी, सरचिटणीस राहिलेले थोरात हे संघ परिवारातील असून पक्षाचे प्रभारी रवींद्र भुसारी त्यांच्या नावासाठी फार आग्रही होते. तर, नायर नुकतेच भाजपमध्ये आले आहेत. यापूर्वी पटवर्धन यांच्या प्रयत्नाने त्यांना सहकार खात्यातील शासकीय पद देण्यात आले होते. मात्र, पक्षांतर्गत घडामोडींमुळे ते तत्काळ काढून घ्यावे लागले होते. त्यापाठोपाठ, कार्यकारिणीतही त्यांचा समावेश होऊ शकला नाही.

आपल्या समर्थकांवर अन्याय होत असल्याचे पाहून खाडे व पटवर्धन एकत्र आले, त्यांनी प्रदेशाध्यक्षांना स्थानिक पातळीवर नेमके काय चालले आहे, याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर, दानवे यांनी हस्तक्षेप करून थोरात तसेच नायर यांचा समावेश करण्याची सूचना शहराध्यक्षांना केली. त्यानुसार कार्यकारिणीत थोरात व नायर यांची नावे समाविष्ट करून सुधारित कार्यकारिणी प्रसारमाध्यमांना देण्याची वेळ जगताप यांच्यावर आली.

संघटन सरचिटणीसपदावरून पुन्हा वादाचे संकेत

शहर भाजपमधील वाद इथेच संपण्याची चिन्हे नाहीत. संघटन सरचिटणीसपदावरून बरेच रामायण घडण्याचे स्पष्ट संकेत आहेत. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना सारंग कामतेकर यांना तर खासदार अमर साबळे यांना माउली थोरात यांना त्या पदावर बसवायचे आहे. अमोल थोरात यांनी यापूर्वीच त्यासाठी ‘फिल्डिंग’ लावलेली आहे.कार्यकारिणीतून पत्ता कापण्याचे  तेच मुख्य कारण होते.