पुणे जिल्ह्यातील शहिदाच्या वीर पत्नीने गेले २७ वर्षे न्यायालयीन लढा देत शासनाने हिरावून घेतलेली १६ एकर जमीन पुन्हा मिळविली आहे. मुंबई उच्च न्यायालयात हा निकाल लागला असून मालतीबाई माधवराव जगताप या वीरपत्नीला त्यांची जागा परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मालतीबाई जगताप या पुणे जिल्ह्यातील वानवडी येथील वीरस्मृती चाळीत राहतात. त्यांचे पती नायक सुभेदार माधवराव जगताप १९६२ सालच्या भारत-चीन युद्धात शहीद झाले. युद्धात माधवराव जगताप यांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल नोव्हेंबर १९६६ मध्ये त्यांना मरणोत्तर राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. मालतीबाईंनी हे शौर्यपदक त्यावेळी स्वीकारले. त्याचवेळी शासनातर्फे १९६७ मध्ये पुण्यातील महंमदवाडी येथे १६ एकर शेतजमीन तसेच सैनिक कल्याण बोर्डाच्या वतीने वानवडी येथील वीरस्मृती चाळीत ४४५ चौरस फुटांची सदनिका त्यांना देण्यात आली. या जमिनीवर मालतीबाई यांनी शेतीही केली. ही जमीन १९८६ पर्यंत मालतीबाई यांच्या नावे होती. परंतु त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता ती जमीन शासनाने त्यांच्या ताब्यातून काढून घेतली.
मालतीबाई यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. शेतीचे उत्पन्न देणारी जमीन हातातून गेल्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मालतीबाई यांना खूपच यातना सहन कराव्या लागल्या. त्यांनी विणकाम करून कुटुंबाची विस्कटलेली घडी सावरण्याचा प्रयत्न केला. मुलींची लग्ने करण्यासाठी त्यांना कर्जे काढावी लागली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मुलाचे शिक्षणही अपूर्ण राहिले. त्याला वयाच्या १३ व्या वर्षांपासून कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी काम करावे लागले. जमीन परत मिळावी यासाठी मालतीबाई यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हा सैनिक मंडळ आदींकडे पत्रांद्वारे गेली २७ वर्षे पाठपुरावा केला. परंतु त्यांच्या पत्राला कोणीही दाद दिली नाही. २०१३ साली पनवेल मधील अॅड. राकेश पाटील यांनी मालतीबाई यांची ही कहाणी ऐकली आणि त्यांनी मालतीबाई यांना न्याय मिळवून देण्याचे ठरवले. अॅड पाटील यांनी कोणतेही शुल्क न घेता मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली. अनेक वेळा न्यायालयीन चकरा झाल्या. अखेर दोन वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने पुरावा म्हणून दिलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी करून मालतीबाई यांच्या वतीने अॅड. राकेश पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मालतीबाई यांना त्यांची १६ एकर जमीन परत करावी, असे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. येत्या ७ सप्टेंबपर्यंत त्यांना याबाबत काय कार्यवाही झाली हे सांगण्याच्या स्पष्ट सूचना न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेशात केल्या आहेत. न्यायमूर्ती अभय ओक आणि रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. मालतीबाई यांचे आज वय ८० च्या आसपास आहे. या निर्णयाबाबत मालतीबाई यांनी समाधान व्यक्त केले आहे.

केवळ ८० रुपये निवृत्तिवेतन
मालतीबाई जगताप यांचे पती नायक सुभेदार हे भारत-चीन युद्धात शहीद झाल्यानंतर शासनाने त्यांना महिना केवळ ८० रुपये निवृत्तिवेतन सुरू केले. त्या वेतनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण असताना त्याच्यात कोणतीही वाढ झाली नाही. आजही मालतीबाई यांना ८० रुपयेच निवृत्तिवेतन मिळते, याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.