नोटाबंदीनंतर पुणे शहरात दोन हजारांची नोट देऊन पाचशे वा शंभरच्या नोटा मागण्याचा बहाणा करणारा चोरटा सक्रिय झाला आहे. नोव्हेंबर २०१६ पासून त्याने विविध व्यावसायिकांना गंडा घालण्याचे अनेक गुन्हे केले आहेत. हा चोरटा हेल्मेट परिधान करून दुकानात शिरतो, नवनवीन बहाणे करतो आणि व्यावसायिकांची रोकड लंपास करून पसार होतो. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात या चोरटय़ाविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांकडून त्याला पकडण्यासाठी प्रयत्नही झाले आहेत. पण हेल्मेट परिधान करणाऱ्या या चोरटय़ाला पकडण्यात पोलिसांना अपयश आले असून नोटाबंदीनंतर शहरात सक्रिय झालेल्या या चोरटय़ाकडून व्यावसायिकांना फसवण्याचे सत्र कायम आहे.

नोटाबंदीनंतर चलनातून बाद करण्यात आलेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा वटवण्याच्या तयारीत असलेल्या काही जणांना पोलिसांनी पकडले. पुणे शहरात चलनातून बाद झालेले कोटय़वधी रुपये पकडण्यात आले आहेत. पण नोटाबंदीनंतर शहरात सक्रिय झालेला हा चोरटा पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरला आहे. किंबहुना या चोरटय़ाला पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. फसवण्यासाठी या चोरटय़ाकडून काही ना काही शक्कल लढवली जाते. नोटाबंदीनंतर या चोरटय़ाने दोन हजारांची नोट सुट्टी मागण्याचा बहाणा करून व्यावसायिकांना गंडवले. तुळशीबाग, लष्कर भाग, कात्रज भागातील एक पतसंस्था, डहाणूकर कॉलनीतील महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र येथे त्याने गुन्हे केले आहेत.

व्यावसायिकांना फसवणारा हा चोरटा हेल्मेट परिधान करून दुकानात शिरतो. हेल्मेट असल्यामुळे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडून त्याचा चेहरा टिपला जात नाही. या चोरटय़ाने सकाळच्या वेळेत फसवणुकीचे गुन्हे केले आहेत. सकाळी दुकानात फारशी गर्दी नसते. तेव्हा व्यावसायिकांना बोलण्यात गुंतवून चोरटय़ाकडून रोकड लंपास केली जाते. दोन हजाराच्या नोटेच्या बदल्यात शंभर रुपयांच्या नोटा द्या, पूजेसाठी सुटे पैसे हवे आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारची बतावणी या चोरटय़ाकडून केली जाते. चोरटय़ाकडून शहरातील अनेक व्यावसायिकांची फसवणूक झाल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत. त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप चोरटय़ाचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांना चोरटय़ाचे वर्णन मिळाले आहे. पण त्याने हेल्मेट घातल्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेल्या चित्रीकरणात चोरटय़ाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. तांत्रिक तपासात चोरटय़ाचा चेहरा सुस्पष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. चोरटय़ाचे वय साधारण ३५ ते ४० वर्ष आहे. काळ्या रंगाची दुचाकी आणि काळ्या रंगाचे हेल्मेट तो वापरतो, अशी माहिती गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याने दिली.

नोटाबंदीनंतर शहरात सक्रिय झालेल्या या चोरटय़ाने पहिल्यांदा लष्कर परिसरात एका बेकरी व्यावसायिकाला फसवले. त्यानंतर लष्कर परिसरात घोडय़ांच्या शर्यतीवर सट्टा घेणाऱ्या दुकानात शिरून दोन हजारांचे सुटय़ा नोटा मागण्याचा बहाणा करून फसवणूक केली. या घटनेनंतर लष्कर पोलिसांकडून लष्कर भागातील व्यावसायिकांना पत्रकेही वाटण्यात आली. ‘दुकानात हेल्मेट घालून येणाऱ्या चोरटय़ापासून सावध राहा. दोन हजारांची नोट सुटी मागण्याचा बहाणा करणाऱ्या चोरटय़ाकडून फसवणूक होऊ शकते,’ अशा सूचना देणाऱ्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. चोरटय़ाचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून लष्कर भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळण्यात आले. मात्र, पोलिसांना चोरटय़ाचा माग काढता आला नाही.

दिघी भागात चोरटय़ाकडून एका दूधविक्रेत्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. दूधविक्रेत्या कंपनीतील कर्मचारी दिघी भागात टेम्पोतून दूध पोहोचवण्यासाठी सकाळी नऊच्या सुमारास पोहोचले. एका घरी दुधाचा रतीब घातल्यानंतर त्यांनी महिलेकडून पैसे घेतले. त्यांच्या मागोमाग आलेल्या दुचाकीस्वार चोरटय़ाने त्यांना अडवले. चोरटय़ाने हेल्मेट परिधान केले होते. चोरटय़ाने कर्मचाऱ्याकडे बतावणी केली. दोन हजारांची नोट सुटी मागितली आणि बोलण्यात गुंतवून चोरटय़ाने दूधविक्रीतून जमा झालेली ३१ हजारांची रोकड लंपास करून पोबारा केला.

नोटाबंदीनंतर झालेले गुन्हे

*   १४ नोव्हेंबर २०१६- लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट येथील दुकानात दोन हजारांची नोट सुटी मागण्याच्या बहाण्याने चोरटय़ाकडून दुकानातील गल्ल्यातून आठ हजार रुपये लंपास

*    २७ नोव्हेंबर २०१६- लष्कर भागातील भोपळे चौक येथे असलेल्या घोडय़ांच्या शर्यतीवर खेळल्या जाणाऱ्या बेटिंग सेंटरमधून २८ हजार रुपये लांबविले

*      ६ डिसेंबर २०१६- कात्रज येथील यशवंतनगर येथे एका पतसंस्थेत वीजबिल भरण्याच्या बहाण्याने १८ हजारांची चोरी

*      २९ डिसेंबर २०१६- लष्कर भागातील महाराष्ट्र जनरल स्टोअर्सचे मालकांकडे दोन हजारांची विशिष्ट क्रमांकाची नोट पूजेसाठी हवी असल्याच्या बतावणीने चोरटय़ाकडून ३१ हजारांची रोकड लंपास

*      ७ जानेवारी २०१७- कोथरूड येथील डहाणूकर कॉलनी भागात महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रातील महिला कर्मचाऱ्याकडे दोन हजारांची नोट पूजेसाठी हवी असल्याची बतावणी. वीजबिल केंद्रात जमा झालेली ६८ हजारांची रोकड घेऊन चोरटा पसार

*      १८ मे २०१७- दिघी भागात दूधविक्रेत्याला गंडा. चोरटय़ाकडून ३१ हजारांची रोकड लंपास