हिंजवडी आयटीपार्कमध्ये काम करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. अचानकपणे ओढवलेल्या प्रसंगामुळे ही महिला चांगलीच घाबरली होती. परिणामी तिला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. दोन दिवसांपूर्वी कंपनीतून काम करुन घरी परतत असताना दोन अज्ञातांनी पीडितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पाऊस सुरु झाल्यामुळे पीडित महिला एका झाडाच्या खाली थांबली असताना हा सर्व प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पीडित मध्यमवयीन महिला तिच्या दुचाकी वाहनावरुन घरी परतत होती. दुपारी चारच्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे महिला एका झाडाखाली थांबली. यावेळी दोन अज्ञात व्यक्तिंनी तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने मित्राशी संपर्क साधला. मित्राने घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच अज्ञातांविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तपास कार्य वेगाने सुरु आहे. हा सर्व प्रकार मुळा नदीच्या पलिकडे असणाऱ्या चांदे-नांदे या भागात घडला. पुणे ग्रामीणच्या हद्दीतील असून शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस मिळून याचा शोध घेण्यात येत आहे. अद्याप आरोपीसंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नसून याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.