शहरात भामटय़ांचा सुळसुळाट झाला असून भामटय़ांनी बतावणी करून वेगवेगळ्या घटनांमध्ये ८३ हजारांचे दागिने लंपास केले. कात्रज आणि ताथवडे परिसरात या घटना घडल्या.
कात्रज परिसरात राहणाऱ्या एका महिलेने या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला कात्रज परिसरातून निघाली होती. त्या वेळी दोन भामटय़ांनी तिला अडविले आणि तुमचे मंगळसूत्र तुटले आहे, अशी बतावणी केली. त्यानंतर भामटय़ांनी तिला रुमालात मंगळसूत्र बांधून ठेवण्याची सूचना केली. महिलेने तिचे मंगळसूत्र रुमालात ठेवले.
त्यानंतर भामटय़ांनी तिचे लक्ष नसल्याची संधी साधली. रुमालातील ४५ हजारांचे मंगळसूत्र लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सी.एम. सूर्यवंशी तपास करत आहेत.
दरम्यान, वाकड परिसरात ताथवडे येथे भामटय़ांनी एका किराणामाल विक्रेत्या महिलेला गंडा घातल्याचे उघड झाले आहे. तिने यासंदर्भात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारात महिला दुकानात होती. त्या वेळी एक भामटा तेथे आला. त्याने साधूसारखी वेशभूषा केली होती. त्याने तिला आशीर्वाद देतो, असे सांगितले.
बतावणी करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि अंगठी असा तीस हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. तिला बोलण्यात गुंतवून ठेवले. मंगळसूत्र आणि अंगठी असा ऐवज लांबवून भामटा पसार झाला. अशाच पद्धतीने भामटय़ाने आणखी एकाला गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. ताथवडे परिसरात बतावणी क रून त्याच्या गळ्यातील अठरा हजार रुपयांचा सोन्याचा बदाम लांबवून भामटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक निकम तपास करत आहेत.