बारामती मतदासंघातील ग्रामस्थांना मतदानासाठी धमकी दिल्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील मधील वडगाव निंबाळकर या पोलिस ठाण्यात अजित पवारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. भारतीय दंडविधानातील १७१ कलमातंर्गत त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.
बारामती मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मुर्टी-मासाळवाडी येथे सभा घेऊन आम्हाला मतदान न केल्यास पाणीपुरवठा बंद करण्याची धमकी अजित पवार यांनी दिली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आप’चे उमेदवार सुरेश खोपडे यांनी पोलिसांकडे तक्रार करत त्यांच्या भाषणाचा ऑडिओ सादर केला होता. त्यानंतर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले होते..