सदनिकेच्या नोंदणीसाठी भरलेली रक्कम ‘अलॉटमेन्ट लेटर’ वरील कराराप्रमाणे जप्त करणाऱ्या ‘लवासा कार्पोरेशन लि.’ला ग्राहक मंचाने दणका दिला. ‘अलॉटमेन्ट लेटर’ हे करारपत्र होऊ शकत नसल्याने त्यावरील अटी आणि शर्थी तक्रारदारास बंधनकारक राहणार नाहीत, असे स्पष्ट करीत लवासाने तक्रारदाराकडून घेतलेली तीन लाख ७६ हजार व्याजासह परत करावी. त्याबरोबरच नुकसान भरपाई म्हणून २५ हजार आणि तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रुपये द्यावेत, असा आदेश पुणे अतिरिक्त ग्राहक मंचाच्या अध्यक्ष अंजली देशमुख यांनी दिला.
‘मोफा’ कायद्यानुसार सदनिकेचे बुकींग केल्यानंतर ग्राहकाला लगेचच नोंदणीकृत करारनामा करून देणे हे बांधकाम व्यावसायिक किंवा प्रमोटरचे कर्तव्य असते. ‘मोफा’ नुसारच केलेला करारनामाच वैध ठरू शकतो. अलॉटमेंट लेटर सारख्या काराराला ‘मोफा’त काहीच अर्थ नाही, असे मंचाने निकालात स्पष्ट केले आहे.
याबाबत विमाननगर येथील लव्हेल सेटीया व श्रेष्ठा सेटीया यांनी लवासा कार्पोरेशन लि.च्या विरोधात मे २०१४ मध्ये तक्रार दाखल केली होती.