24 September 2017

News Flash

सिग्नल तोडून निघालेल्या पोलिसाची मुजोरी

पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत निश्चितच मोठे आहे.

प्रतिनिधी, पुणे | Updated: September 13, 2017 2:14 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

समाजमाध्यमांवर चित्रफीत प्रसारित

पुण्यातील वाहनचालक त्यांच्या बेशिस्तसाठी प्रसिद्ध आहेत. सिग्नल तोडणे हा तर पुणेकर वाहनचालकांचा हक्क मानला जातो. मात्र, सामान्य नागरिकांबरोबरच पोलीसदेखील वाहतुकीचे नियम सर्रास मोडत आहेत. सोमवारी पुणे महापालिकेजवळ सिग्नल मोडून निघालेल्या एका दुचाकीस्वार पोलिसाला नागरिकांकडून जाब विचारण्यात आल्यानंतर त्याने नागरिकांना अर्वाच्च भाषा वापरली. पसार झालेल्या पोलिसाची चित्रफीत समाजमाध्यमावरुन प्रसारित करण्यात आल्यामुळे त्या मुजोर पोलिसावर कारवाई करण्याची मागणी प्रत्यक्षदर्शीकडून करण्यात आली आहे.

पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत निश्चितच मोठे आहे. सिग्नल मोडणे, रस्ता ओलांडण्यासाठी आखण्यात आलेल्या पट्टय़ांवर वाहन उभे करणे, मोबाइलवर संभाषण करणे अशा प्रकारच्या नियमांचा सर्रास भंग केला जातो. प्रमुख चौकात वाहतूक पोलीस नसल्यास सिग्नल तोडून वाहनचालक पसार होतात. पोलिसांकडून चौकाचौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांना जरब बसली आहे. नियमभंग केल्यास वाहनचालकाला थेट दंडाची रक्कम मोबाईलवर संदेशाद्वारे पाठविण्यात येते. त्यामुळे काही प्रमाणात बेशिस्त वाहनचालकांना चाप बसला. मात्र, सामान्यांबरोबरच अनेक पोलिसांकडूनही वाहतुकीचे नियम सर्रास मोडले जात असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

महापालिका भवन  चौकात सोमवारी (११ सप्टेंबर) सकाळी  पावणेदहाच्या सुमारास सिग्नल तोडून निघालेल्या एका पोलिसाला नागरिकाने जाब विचारला. तेव्हा पोलिसाने थेट त्या नागरिकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ चौकात वाहतुकीची कोंडी झाली. त्या वेळी पोलिसाने स्वत:ची चूक कबूलदेखील केली नाही; उलट नागरिकांना त्याने शिवीगाळ केली, असा संदेश आणि चित्रफीत नागरिकांकडून समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आली. या घटनेनंतर प्रत्यक्षदर्शीनी वाहतूक पोलिसाच्या दुचाकीचा क्रमांक देखील समाजमाध्यमावर दिला आणि त्याच्यावर कारवाईची मागणी केली. यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे म्हणाले, की समाजमाध्यमावरुन प्रसारित झालेली चित्रफीत पाहण्यात आली. त्या पोलिसाचा वाहनक्रमांक टिपण्यात आला आहे. त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल.

काही दिवसांपूर्वी जंगली महाराज रस्त्यावरील पादचारी पट्टयांवर काही दुचाकीस्वार थांबल्याचे छायाचित्र समाजमाध्यमावरुन प्रसारित करण्यात आले होते. पोलिसांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा, असे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. मात्र, बहुतांश पोलिसांकडून या आदेशाचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळत आहे.

First Published on September 13, 2017 2:14 am

Web Title: cop breaking traffic signal video viral on social media
 1. A
  Ajay
  Sep 15, 2017 at 1:17 pm
  काही वर्षांंपुर्वी पोलीसांंनी बेड्या घातलेल्या गुन्हेगाराला चारचाकी ी चालवायला लावली व पोलीस देखील त्या वाहणात बसून कोथ्रुकडे जायला निघाले.संंभाजी रोडवर या ीने चार जणांंना ीखाली चीरडले. यात पोलीसांंना कोणती शीक्षा झाली कधीच पेपरला आले नाही .
  Reply
  1. J
   jai
   Sep 13, 2017 at 1:08 pm
   " पुण्यातील वाहनचालक त्यांच्या बेशिस्तसाठी प्रसिद्ध आहेत. सिग्नल तोडणे हा तर पुणेकर वाहनचालकांचा हक्क मानला जातो" सगळेच नागरिक बेशिस्त नसतात सर्व पुणेकरांबद्दल लेखकाला एवढी पोट दुखी कारे बाबा . एवढी बेशिस्त वाढायची कारणे काय आहेत सगळ्या देशात हि परिस्थिती आहे..
   Reply