रिक्षा चालक-मालक संघटना कृती समितीचे कार्याध्यक्ष शरद राव यांनी पुण्यात स्वतंत्र सभा घेऊन घेतलेले निर्णय अनधिकृत आहेत. समितीत एकतर्फी निर्णय घेण्याचे अधिकार कोणालाही नाहीत. त्यामुळे पदाधिकारी बदलण्याबरोबरच इतर निर्णय त्यांनी मागे घ्यावेत, असे समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी म्हटले आहे.
राव यांच्या नेतृत्वाखाली २१ एप्रिलला पुण्यात रिक्षाचालकांचा मेळावा व सभा घेण्यात आली. त्यात अध्यक्ष बाबा आढाव, सरचिटणीस नितीन पवार किंवा इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश नव्हता. या सभेमध्ये इतर काही निर्णयांबरोबरच सरचिटणीस पवार यांना पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व निर्णयांना आढाव यांनी आक्षेप नोंदविले आहेत.
या संदर्भात आढाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांची भूमिका मांडली आहे. पुण्यात झालेल्या सभेची कृती समितीचा अध्यक्ष म्हणून आम्हाला माहिती नव्हती. सभेपूर्वी किंवा त्यानंतर राव यांनी साधी भेटही घेतली नाही. या सभेच्या कामकाजाची माहिती आम्हाला वृत्तपत्रातून कळली. समितीचा अध्यक्ष म्हणून माझी शरद राव यांना विनंती आहे की, पुण्याच्या सभेत त्यांनी अनधिकृतपणे पदाधिकारी बदलण्याबाबत व इतर घेतलेले निर्णय लादण्याचा प्रयत्न करू नये. एकतर्फी निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्ष म्हणून मला किंवा कुणा एका पदाधिकाऱ्याला नाही. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा. समितीतील एकजूट ही काळाची गरज आहे, असे आढाव यांनी म्हटले आहे.