मुख्यमंत्र्यांची घोषणा

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात संघर्ष यात्रा काढणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना उद्देशून निर्लज्ज, कोडगे, नालायक अशी शेलकी विशेषणे देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भ्रष्ट कारभारावर गुरुवारी खरमरीत टीका केली. गोरगरीब शेतक ऱ्यांच्या हिश्श्याचे पैसे यांनी खाल्ले, पंतप्रधानांचे पॅकेज यांच्या आमदार-खासदारांनी संगनमताने लाटले. जनतेने नाकारल्यानंतर ‘व्हीआयपी कल्चर’मध्ये रमणारे हे नेते १८ वर्षांनंतर जमिनीवर आले आहेत. त्यांच्या ‘पूर्वकर्तृत्वा’मुळे जनता त्यांना थारा देत नाही. त्यांच्या संघर्ष यात्रेला आम्ही ‘संवाद यात्रे’ने प्रत्युत्तर देणार असून राज्यभरातील २५ लाख शेतक ऱ्यांशी संवाद साधण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

भाजपच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने झाला, तेव्हा ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू व्यासपीठावर होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की त्यांचा संघर्ष फक्त नावात आहे. गोपीनाथ मुंडे यांनी काढली, तीच खरी संघर्ष यात्रा होती. सध्याच्या संघर्ष यात्रेकरूंना सामान्य जनतेशी काही घेणं-देण नाही. ‘व्हीआयपी कल्चर’मध्ये रमणाऱ्यांना १८ वर्षांनंतर उपरती झाली. मात्र, त्यांना जनतेचे समर्थन नाही, त्यांच्या सभांना माणसे येत नाहीत. कारण, त्यांच्या भ्रष्टाचारामुळेच हे दिवस आल्याचे जनतेला, शेतक ऱ्यांना चांगलेच माहिती आहे. शेती, सिंचन, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात यांचे हात बरबटलेले आहे. या परिस्थितीला जबाबदार असणारेच संघर्ष यात्रा काढतात, हा त्यांचा निर्लज्जपणा आहे. शेतक ऱ्यांचे पैसे यांनीच खाल्ले, पंतप्रधानाचे पॅकेज यांच्या आमदार, खासदारांनी वाटून खाल्ले. तरीही हे कोडगे नेते जनतेसमोर जाऊन कसे बोलू शकतात, याचे आपल्याला आश्चर्य वाटते. लोकांना आपल्याकडून संवाद हवा आहे. संघर्ष यात्रेला उत्तर म्हणून आपली ‘संवाद यात्रा’ असणार आहे. त्यासाठी आपण गावोगावी जाणार आहे. हा संवाद शिवारात जाऊन व्हायला हवा. जवळपास २५ लाख शेतक ऱ्यांशी आपल्याला संवाद साधायचा आहे, असेही ते म्हणाले. आम्ही शेतक ऱ्यांकरिता जन्माला आलो, सत्तेत आलो आहोत. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. वस्तू व सेवाकरामुळे कुठल्याही प्रकारच्या चोरीला वाव राहणार नाही आणि कृत्रिम भाववाढही होणार नाही. पक्षप्रमुखांनी दिलेल्या १५ दिवसांच्या विस्तारक मोहिमेत सर्वानी सहभाग घेतला पाहिजे, कोणीही घरी बसता कामा नये, अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

सत्ता गेली तरी चालेल; भ्रष्ट कारभार चालणार नाही

भाजपच्या विजयाची ही मालिका सुरूच राहणार आहे. विजयामुळे उन्मत्त होऊ नका. पदांसाठी रुसू नका. सत्ता नसते, तेव्हा तडजोडी कराव्या लागतात. मात्र जनतेने भरभरून सत्ता दिली असताना त्याची गरज नाही. पक्ष कोणामुळे थांबत नाही. माझ्यामुळे पक्ष आहे, असे कोणी समजण्याचे काहीच कारण नाही. महापालिका, जिल्हा परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शी काम झाले पाहिजे, अन्यथा, सत्ता गेली तरी चालेल, भ्रष्ट प्रवृत्तींना पदावर राहू देणार नाही. तडजोडीचे राजकारण चालणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे वागू नका. त्यांनी भ्रष्ट कारभाराबरोबरच जातीचे आणि विश्वासार्हता नसलेले राजकारण केले. आपल्याला विकासाचे आणि विश्वासाचे राजकारण करायचे आहे, त्यासाठी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. आपल्या दृष्टीने जनता ही भगवान राम असून भरताप्रमाणे विश्वस्त म्हणून काम करायचे आहे. सत्तेचे आपण मालक नाही, ही भावना असायला हवी. तरच, पुढील काळात आपण पराजित होऊ शकत नाही. जनतेने मोठय़ा विश्वासाने सत्ता दिली, त्यांच्यापासून आपण दूर जाता कामा नये. ‘व्हीआयपी कल्चर’ आपल्याला नको आहे. जुन्या राज्यकर्त्यांनी तेच केले म्हणून जनतेने त्यांना नाकारले. विजयातून अहंकार नको, तर नम्रता हवी आणि जबाबदारीची जाणीवही हवी. सत्ता समाजपरिवर्तनासाठी असली पाहिजे.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री