केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती

पूर्वी जेवढे उत्तरपत्रिकेत लिहिले तेवढेच गुण मिळायचे, आता वेगळेच झाले आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: मिळवलेल्या गुणांपेक्षा त्यांना अधिक गुण मिळत आहेत. सर्वानाच ९५-१०० टक्के गुण मिळत असून आपला पाल्य उत्कृष्टच आहे, अशी पालकांची धारणा होत आहे. त्यामुळे अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या गुणांचा फुगवटा बंद केला जाणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी सांगितले. खरे गुण मिळणे महत्त्वाचे असून त्याची जाणीव पाल्य आणि पालक दोघांना असणे गरजेचे आहे, असेही जावडेकर म्हणाले. सरस्वती मंदिर संस्थेच्या रात्रशाळा व महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार जावडेकर यांच्या हस्ते करण्यात याला. या कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे विश्वस्त रवींद्र जोशी, कार्याध्यक्ष विनायक आंबेकर, उपकार्याध्यक्ष प्रसेनजीत फडणवीस, सहचिटणीस, सु. प्र. चौधरी, स्मार्ट सिटी फाउंडेशनचे डॉ. संदीप बुटाला या वेळी उपस्थित होते. महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मण चव्हाण आणि खासगी कंपनीमध्ये विक्री प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या रेखा शिरसट यांचा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच दिवसभर काम करून रात्र महाविद्यालयात शिकून बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त केल्याबद्दल अमर शिंदे, पीयुषा घोरपडे यांचा आणि अन्य विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात करण्यात आला.

जावडेकरांचा विद्यार्थ्यांशी संवाद

दिवसभर काम करून रात्र शाळेत शिकताना, अभ्यास करताना काय अडचणी येतात, बिकट परिस्थितीवर कशी मात केली, शिकून पुढे काय बनायचे आहे, असे विविध प्रश्न विचारत कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर बसून प्रकाश जावडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिद्दीने शिका, परिस्थितीशी झगडणाऱ्यांना समाजाची साथ मिळतेच, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.