पिल्लांच्या बेपत्ता होण्याबद्दल प्रश्नचिन्ह; परस्परविरोधी दाव्यांमुळे संशयाचे वातावरण

पिंपरी पालिकेच्या आकुर्डीतील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील ढिसाळ कारभार २०हून अधिक सापांच्या संशयास्पद मृत्यूमुळे चव्हाटय़ावर आल्याचे प्रकरण ताजे असतानाच याच प्राणिसंग्रहालयातील मगरीची पाच पिल्ले आश्चर्यकारकरीत्या गायब झाल्याची माहिती उजेडात आली आहे. गेल्या वर्षभरात तीन मगरींच्या पिलांचा मृत्यू झाल्याचे आणि दोन पिले चोरीला गेल्याचे या विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, यासंदर्भात परस्परविरोधी माहिती देण्यात येत असल्याने संशयास्पद वातावरण निर्माण झाले असून, उलटसुलट तर्क लढवण्यात येत आहेत.

आकुर्डीत सात एकर जागेत पालिकेचे प्राणिसंग्रहालय आहे. सर्पोद्यान म्हणूनही ही वास्तू ओळखली जाते. योग्यप्रकारे निगा राखली जात नसल्याने घोणस, नाग, धामण, दिवड, तस्कर जातीच्या विविध २० सापांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण नोव्हेंबर २०१६ मध्ये उजेडात आले होते. जागरूक नागरिक तसेच काही सर्पमित्रांनी हा प्रकार उघड केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. येथे आणल्या जाणाऱ्या पशू, प्राण्यांची योग्यप्रकारे निगा राखली जात नसल्याची जुनी तक्रार आहे. ‘किंग कोब्रा’ चोरीला गेल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यातच सापांच्या मृत्यूंमुळे येथील गैरकारभार नव्याने पुढे आला होता. या प्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने विभागप्रमुख डॉ. सतीश गोरे यांच्यावर ठपका ठेवला. आयुक्तांनी गोरेंच्या चौकशीचे आदेश दिले. एकीकडे हा घटनाक्रम असतानाच प्राणिसंग्रहालयातील मगरींच्या पाच पिलांचे काय झाले, असा कळीचा मुद्दा पुढे आला आहे.

या ठिकाणी नऊ मगरी आहेत. तीन लहान, तीन मध्यम आणि तीन मोठय़ा असे सांगितले जाते. प्रत्यक्षात जागेवर दोन ते तीन मगरी दिसून येतात. तीन मगरींचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्याची कागदावर नोंद आहे की नाही, या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. मृत मगरींचे शवविच्छेदन करण्यात आल्याचे पालिका अधिकारी ठामपणे सांगतात. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण सांगितले जात नाही. दोन मगरी चोरीला गेल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याची पोलीस तक्रार झालेली नाही. लगतच्या पोलीस चौकीत तक्रार केल्याचे पालिकेकडून सांगितले जात असताना पोलीस मात्र आमच्याकडे तक्रारीची नोंद नसल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळे एकूणच या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असल्याची शंका घेण्यास जागा आहे. याबाबतची माहिती देण्यास तसेच या संदर्भात अधिकृतपणे भाष्य करण्यास कोणीही तयार नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.