शहराच्या लौकिकामध्ये भर घालत पुण्याची शान झालेले आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी सूत्रधार होऊन कलाकार व प्रेक्षकांच्या सोयी-सुविधांच्या पूर्ततेकडे लक्ष दिल्यामुळे साकारले गेलेले बालगंधर्व रंगमंदिर सोमवारी (२६ जून) सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. बालगंधर्व रंगमंदिराचा आदर्श राज्यातील विविध शहरांमध्ये नाटय़गृहांची उभारणी करण्यात जपला गेला आहे.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
sukma ram mandir
छत्तीसगडमधील माओवाद्यांनी बंद केलेले राम मंदिर २१ वर्षांनी खुले
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन

स्वातंत्र्योत्तर काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र रंगमंदिराच्या उभारणीला प्राधान्य देणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली आहे. संगीत रंगभूमीसाठी आपले जीवन वेचणारे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी साकारण्यात आलेल्या या रंगमंदिराचे भूमिपूजन ८ सप्टेंबर १९६२ रोजी दस्तुरखुद्द बालगंधर्व यांनीच केले होते. रंगमंदिराचे बांधकाम १९६६ मध्ये सुरू झाले. १५ जुलै १९६७ रोजी बालगंधर्व यांची प्राणज्योत मालवली. पु. ल. देशपांडे यांनी या रंगमंदिराची रचना सर्वोत्तम असावी यासाठी कष्ट घेतले. ज्येष्ठ चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडून पुलंनी ‘स्वयंवर’मधील रुक्मिणीच्या वेशातील आणि पुरुष वेशातील अशी बालगंधर्व यांची दोन मोठय़ा आकारातील तैलचित्रे करून घेतली. विशेष म्हणजे बालगंधर्वाच्या नाटकात वापरण्यात आलेला ऑर्गनही रंगमंदिरात तैलचित्रांखाली ठेवण्यात आला आहे. कलाकार, रसिक प्रेक्षक, तंत्रज्ञ यांच्या सोयीचा विचार करून ऐसपैस, सर्वोत्तम ध्वनिव्यवस्था आणि प्रशस्त रंगमंचासह नेपथ्य सामानाची गाडी रंगमंचावर उतरविण्याची सोय करण्यापासून ते कुरकुरणाऱ्या मुलांचा व्यत्यय येणार नाही यासाठी ‘ग्लासबॉक्स’ची सोय करण्यापर्यंतचा विचार पुलंनी केला आणि एक उत्कृष्ट रंगमंदिर साकारले गेले. ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के यांनी या रंगमंदिराची उभारणी केली.

बालगंधर्व यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २६ जून १९६८ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले होते. तेव्हाचे महापौर ना. ग. गोरे आणि पु. ल. देशपांडे यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम नेटका होईल याकडे लक्ष दिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आचार्य अत्रे उपस्थित राहू शकले नाहीत. पण, ‘मराठा’तील अत्रे यांच्या अग्रलेखाचे वाचन ना. ग. गोरे यांनी केले होते. पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार या दिग्गज कलाकारांनी नांदी सादर केली होती.

तर, दुसऱ्या दिवशी ‘एकच प्याला’ नाटकाचा प्रयोग सादर झाला होता. तेव्हापासून हे रंगमंदिर पुणेकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. या रंगमंदिरामध्ये नाटकाचा प्रयोग करण्याचा आनंद आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविण्यासाठी रंगभूमीवरचा प्रत्येक कलाकार आसुसलेला असतो. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रयोग करणे ही जणू कलाकाराच्या जीवनातील भाग्याची गोष्ट असते.

ओंकारेश्वर ते नटेश्वर

बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी या परिसराचे वर्णन करीत नेमके निरीक्षण आपल्या ओघवत्या शैलीत मांडणाऱ्या पुलंचे भाषण गाजले होते. पुलं म्हणाले होते, इथं बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातील स्त्री म्हणजे झाशीची राणी आहे आणि आतल्या बाजूला देऊस्करांनी चितारलेला स्त्री वेशातील पुरुष म्हणजे गंधर्व आहेत. अर्धनारी नटेश्वराची दोन रूपं जिथं आहेत तिथं हे नटेश्वराचे मंदिर उभारलं जातंय, ही आनंदाची गोष्ट आहे. अलीकडे ‘नटेश्वर’ आहे, पलीकडे ‘ओंकारेश्वर’ आहे; मधून जीवनाची सरिता वाहतीये. आमचे महापौर त्याच्यावर पूल टाकणार आहेत. माझी विनंती आहे, की हा पूल एकतर्फी असू द्या.. ओंकारेश्वराकडून नटेश्वराकडे येणारा!