दुर्मिळ साहित्य प्रकाशित करून मराठी वाङ्मयामध्ये मोलाची भर घालणारे ‘वरदा’ प्रकाशनचे हनुमंत अनंत ऊर्फ ह. अ. भावे (वय ८१) यांचे अल्प आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
अभियंते असलेल्या भावे यांनी पाटबंधारे विभागात नोकरी केली. मात्र प्रकाशनाच्या क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने ते धुळ्याहून पुण्याला आले. स्वेट मॉर्डेन या ब्रिटिश लेखकाच्या बहुतांश पुस्तकांचा अनुवाद करून प्रकाशित केली. कॉपीराइटचा हक्क संपुष्टात आलेली परंतु दुर्मिळ अशी अभिजात पुस्तके भावे यांनी प्रकाशित केली. रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’, न्या. महादेव गोविंद रानडे चरित्र, ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे ‘महिकावतीची बखर’ या पुस्तकांसह राजारामशास्त्री भागवत यांचे समग्र वाङ्मय त्यांनी आठ खंडांमध्ये प्रकाशित केले. भावे यांच्या सूचनेनुसार विदुषी दुर्गा भागवत यांनी ‘बाणभट्टाची कादंबरी’ हे पुस्तक अनुवादित केले. भावे यांनी दुर्गा भागवत यांचे बहुतांश साहित्य प्रकाशित केले. वा. गो. आपटे संपादित ‘शब्द रत्नाकर’  हा मराठी शब्दकोश आणि ‘महाराष्ट्र शब्दकोश’ प्रकाशित करून त्यांनी कोशवाङ्मयामध्ये भर घातली. शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांचे चरित्र यासह अभियांत्रिकी, चित्रकला अशा विषयांवर लेखन करून भावे यांनी ही पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिली.