परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीबाबत भाष्य केल्यानंतर पुण्यात वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सकाळपासूनच त्याबाबत कारवाई सुरू केली. गुरुवारी दिवसभरात हेल्मेट न वापरणाऱ्या तीन हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करून त्यांच्याकडून तीन लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. ही कारवाई यापुढे आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
पुण्यात मागील वेळी हेल्मेट सक्तीची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी सुरू करून कारवाई करण्यात आल्यानंतर बहुतांश पुणेकरांनी विविध कारणास्तव या सक्तीला विरोध केला होता. त्यामुळे सक्तीपेक्षा जनजागृतीवर भर देण्यात येणार असल्याचे सांगत हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सौम्य करण्यात आली. वाहतुकीचा नियम मोडल्याच्या प्रकरणात एखाद्या दुचाकीस्वाराला पकडल्यानंतर त्यात हेल्मेट न वापरल्याबद्दलचा दंडही वसूल केला जात होता. मात्र, परिवहन मंत्र्यांनी हेल्मेट सक्तीच्या राज्यभर अंमलबजावणीविषयी भाष्य केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी शहरात तातडीने कारवाई सुरू केली.
गुरुवारी शहराच्या प्रमुख रस्त्यांवर हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. कर्वे रस्ता, डेक्कन, शिवाजीनगर आदी भागांमध्ये प्रामुख्याने कारवाई करण्यात आली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे तीन हजार दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्वच भागामध्ये ही कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी एका कार्यक्रमादरम्यान हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, कायद्यानुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारावर पोलिसांकडून आधीपासूनच कारवाई करण्यात येत आहे.