मनसे, पिंपरी

महापालिकेत मनसे २०१२ नगरसेवक

पोषक वातावरण, हक्काचे मतदार आणि लढवय्ये कार्यकर्ते असतानाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरीत खाते उघडते की नाही, इतपत आव्हानात्मक परिस्थिती आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे यंदाही िपपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष आहे. पिंपरीतील अवस्था लक्षात आल्याने या ठिकाणी शक्ती खर्च करणे व्यर्थ असल्याची त्यांची धारणा असावी. मात्र, त्यांचे खंदे समर्थक व माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्याकडे पिंपरीची जबाबदारी देण्यात आली असून पिंपरी मनसेची सर्व मदार आता त्यांच्यावरच आहे.

राज्यभरात मनसेची जी अवस्था आहे त्याला पिंपरी -चिंचवडही अपवाद नाही. मनसेने अर्थात राज ठाकरे यांनी िपपरीकडे फारसे लक्ष दिलेच नाही. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे पक्षाची वाढ झाली नाही. मनसेने सर्वप्रथम २००७ मध्ये पिंपरी महापालिकेची निवडणूक लढवली. तेव्हा मोजक्या ठिकाणी उमेदवार उभे केले. प्रचारासाठी राज ठाकरे िपपरीत आले, त्यांच्या लोकप्रियतेमुळे सभेला विक्रमी गर्दी झाली. प्रत्यक्षात, एकही जागा मनसेलाजिंकता आली नाही. पाच वर्षांनंतर म्हणजे २०१२ च्या निवडणुकीत मात्र वेगळे चित्र पुढे आले. राज्यभरातील मनसेच्या वातावरणाचा लाभ झाल्याने मनसेचे अश्विनी चिखले, मंगेश खांडेकर, राहुल जाधव आणि अनंत कोऱ्हाळे हे चार नगरसेवक निवडून आले. पुढे पाच वर्षे ते पक्षाबरोबर राहू शकले नाहीत. त्यापैकी तीन जण पक्ष सोडून गेले.

या पाच वर्षांत मनसेची शहरभरातील कामगिरी सुमार अशीच राहिली. चांगले कार्यकर्ते होते, पक्षवाढीसाठी अनुकूल वातावरण होते. मात्र, नेत्यांनी फारसे लक्ष न दिल्याने शहरात पक्षाची संघटनात्मक वाढ होऊ शकली नाही. निधीची कमतरता हा बाराही महिने भेडसावणारा प्रश्न राहिला आहे, त्याचा कधीही विचार झाला नाही. या सर्व कारणांमुळे आजमितीला अशी अवस्था आहे, की गेल्या वेळी आलेल्या चार जागा राखता येतील का, याची शाश्वती नाही. मनसेला भोपळा तरी फोडता येईल का, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. शहरातील ३२ प्रभागांच्या मिळून मनसेला १२८ जागा लढायच्या आहेत. त्या दृष्टीने सक्षम उमेदवार मनसेकडे नाहीत. इच्छुकांचे अर्ज मागवल्यानंतर १००-१२५ अर्ज आले. मात्र, समाविष्ट गावे आणि ग्रामीण भागात उमेदवार मिळतील की नाही, अशी परिस्थती आहे. एकटय़ाच्या जीवावर मनसेचा निभाव लागू शकणार नाही. युती करण्याविषयी राज ठाकरे यांनी सकारात्मक दाखवली असली, तरी िपपरीत कोणापुढे मैत्रीचा हात पुढे करायचा, हा प्रश्नच आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी किंवा शिवसेना-भाजपशी युती असे दोन पर्याय मनसेपुढे आहेत. आघाडी व युती न झाल्यास चार स्वतंत्र पक्षांचे चार पर्याय मनसेला उपलब्ध असतील. मात्र, यासंदर्भातील कोणताही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक नेत्यांना नाही. जो काय निर्णय घ्यायचा असेल तो राज ठाकरेच घेणार आहेत. आतापर्यंत रेंगाळलेल्या अवस्थेत असलेल्या शहर मनसेमध्ये निवडणुकांच्या तोंडावर जान आली आहे. त्याचे कारण, बाळा नांदगावकर यांनी शहरात लक्ष घातले आहे. नांदगावकरांनी संघटनात्मक नियुक्तया केल्या, कार्यकारिणी जाहीर केली. निवडणुकांच्या दृष्टीने इच्छुकांचे सव्‍‌र्हेक्षण करून घेतले. अनधिकृत बांधकामे, निगडीपर्यंतची मेट्रो, शास्तीकर, पर्यावरण समस्यांसह मनसेच्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत, याची माहिती असलेले अर्ज भरून घेण्यात आले. गणेश सातपुते, रणजित शिरोळे यांना निवडणूक काळातील व्यवस्था पाहण्याच्या सूचना करण्यात आल्या. आता निवडणूक काळात िपपरीत पक्षाचे कार्यालय सुरू होणार आहे, त्यासाठी ‘राज साहेब’ येणार असल्याच्या आनंदात मनसे कार्यकर्ते आहेत. मात्र, कार्यालय सुरू झाले म्हणजे नगरसेवक निवडून येतील, असे काही होणार नाही. त्यासाठी राज ठाकरे यांनी मुंबई, नाशिकप्रमाणे िपपरीतही कायम लक्ष ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा मनसे कार्यकर्त्यांची आहे.