‘या मातीत मातीत माझ्या आईचं काळीज, या मातीत मातीत माझ्या बापाचं रगत’.. कालची शेती हेक्टरात, आजची एकरात तर, उद्याची गुंठय़ात असेल.. ठिबक सिंचनाकडे वळालो नाही तर भविष्यात पाण्याविना शेती करावी लागेल.. पूर्वी शेतकरी श्रीमंत नसला तरी सुखी-समाधानी होता.. आमच्या पिढीला सेंद्रीय शेतीविषयी जनजागृती करावी लागेल.. शालेय विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासह मान्यवर रविवारी भारावून गेले आणि या मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

‘ग्यान-की’ संस्थेतर्फे ज्ञानप्रबोधिनीच्या सहकार्याने ‘शेती : काल, आज आणि उद्या’ या विषयावर घेण्यात आलेल्या विचार स्पर्धेतील विजेत्या पायल बोबडे, माधुरी नवघरे, आरती कंगाळे, प्रगती केसकर, रोहित चवरे, सृष्टी इंगळे, माहेश्वरी बेहरे, रेखा महाजन, ऋषिकेश नागरे, प्रतीक्षा सावंत, चैत्राली ओक, शिवानी निरुके, विवेक गायकवाड, वसुंधरा पिसाळ, अनुश्री बेकवडकर या विद्यार्थ्यांना माशेलकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विजेत्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी पारितोषिक स्वीकारण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच पुणे शहरामध्ये आल्याचे सांगितले. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनायक पाटणकर, विचार स्पर्धेचे प्रमुख सुरेश पिंगळे, राज्याचे माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, ‘झी २४ तास’चे संपादक उदय निरगुडकर, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर, अभिनेते सारंग साठे या वेळी उपस्थित होते.

चंद्रावर आणि मंगळावर भविष्यात शेती करणे शक्य होईल का, असे एका विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नाचे कौतुक करताना माशेलकर म्हणाले, आज जे अशक्यप्राय वाटते ते उद्या शक्य होऊ शकेल. माणसाला हवेत उडत जाणे शक्य नव्हते. मात्र, राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावल्यामुळे माणूस उडू लागला. परम महासंगणकाची निर्मिती आणि अवकाशात उपग्रह सोडण्याची मोहीम सरकारच्या पाठबळावरच शक्य झाली आहे. मात्र, मूलभूत विज्ञान संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ही मुले विचार करीत आहेत हे महत्त्वाचे आहे. स्वप्न पाहिल्याशिवाय ती खरी होत नाहीत. मात्र, उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी कोणत्या मार्गाने जायला हवे याचा विचार केला पाहिजे. इन्संट कॉफीसारखे यश तत्काळ मिळत नाही हे ध्यानात घ्यायला हवे. प्रशांत गिरबने, कादंबरी लोखंडे आणि युगांती लोखंडे यांनी मुलांना बोलते केले.