प्राप्तिकर विभागाच्या मुंबईतील पथकाकडून झाडाझडती

राजकीय वर्तुळात मोठा दबदबा तसेच अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांशी सलगी असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या पुण्यातील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी छापे टाकले. प्राप्तिकर विभागाच्या मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते.

युवक काँग्रेसचे पदाधिकारी विश्वजित कदम हे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत. अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नाली यांच्याशी विश्वजित यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला. अविनाश भोसले यांची ‘एबीआयएल’ ही बांधकाम कंपनी असून या कंपनीच्या कारभारात स्वप्नाली यांनी लक्ष घातले आहे. गणेशखिंड रस्त्यावर भोसले यांच्या कंपनीचे कार्यालय आहे. भोसले आणि त्यांचे जावई विश्वजित यांच्या काही व्यवहारांवर प्राप्तिकर विभागाचे लक्ष होते. प्राप्तिकर विभागाच्या मुंबई विभागाच्या पथकाने शुक्रवारी गणेशखिंड रस्त्यावरील भोसले यांचे कार्यालय तसेच त्यांचे जावई विश्वजित यांच्या कार्यालयावर छापे टाकले.

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी भोसले आणि कदम यांच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त केली आहेत. मात्र, याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही. या संदर्भात प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी भोसले आणि त्यांचे जावई विश्वजित यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही कारवाई प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयाकडून झाली नाही. प्राप्तिकर विभागातील मुंबईतील अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या कारवाईविषयी अधिक माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. कारवाईमागचे कारण देखील समजले नाही, असे प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले.

 

 जावई आणि सासरे दोघे बडे प्रस्थ

अतिशय गरिबीतून वर आलेले अविनाश भोसले हे बांधकाम व्यवसायातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाते. राज्यातील सर्व राजकीय पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांशी अतिशय सलगीचे संबंध असलेल्या भोसले यांचा कृष्णा खोरे विकास महामंडळात असलेला दबदबा सर्वश्रुत होता. त्यांचा पाचगणी येथील बंगला आणि पुण्यातील बाणेर येथील सर्व सुखसोयींनी युक्त असा राजप्रासाद याबद्दल नेहमीच दबक्या आवाजत चर्चा होत असते. या बंगल्यांत त्यांच्या मालकीचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅडचीही सुविधा आहे. एबीआयएल कंपनीकडून पुणे, मुंबईसह देशभरातील मोठय़ा शहरांमध्ये भव्य गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. भोसले यांचे पुण्यात पंचतारांकित हॉटेल आहे. परदेशातून महागडी मनगटी घडय़ाळे आणल्याप्रकरणी सीमाशुल्क विभागाकडून (कस्टम) भोसले यांच्यावर कारवाई देखील झाली होती.

माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र असलेले विश्वजित कदम हे भारती विद्यापीठ या अभिमत विद्यापीठाचे कार्यवाह आहेत. त्यांचा काहीच वर्षांपूर्वी अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नाली यांच्याशी विवाह झाला आहे. पतंगराव कदम यांच्यानंतर त्यांचे वारसदार म्हणून विश्वजित यांना पुढे करण्यात आले आहे. भारती विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेच्या कामकाजात विश्वजित यांनी लक्ष घातले आहे. विश्वजित यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत कदम यांनी मोठय़ा प्रमाणावर पैसे खर्च केल्याची चर्चा होती. विश्वजित हे उत्तम फुटबॉलपटू आहेत.