पीएमआरडीएकडून लवासासाठी लवकरच नवा आराखडा

लवासा कॉर्पोरेशनकडून तयार करण्यात आलेला बृहत आराखडा राज्य शासनाकडून नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) विकास आराखडय़ाबरोबरच (डेव्हलपमेंट प्लॅन – डी. पी) लवासा सिटीसाठी लवकरच बृहत आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या कलम २३ नुसार प्रस्तावित विकास आराखडय़ाचा इरादा जाहीर करण्यात आला असून त्याबाबतची कार्यवाही प्राधिकरणाकडून सुरू आहे. प्राधिकरणाच्या विकास आराखडय़ाबरोबरच लवासा सिटीचा २३ हजार एकर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याची प्राधिकरणाची योजना असून त्यानुसार कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पीएमआरडीएकडे अधिकृतपणे सूत्रे येण्याआधी लवासा कॉर्पोरेशनकडून लवासा सिटीचा साडेदहा हजार एकर क्षेत्राचा बृहत आराखडा तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आला होता. परंतु, राज्य शासनाने तो नामंजूर केला आहे.याबरोबरच प्राधिकरणाने शासनाला पत्र लिहून लवासाच्या बृहत आराखडय़ाबाबत शासनस्तरावरून काही कार्यवाही करण्यात आली आहे किंवा कसे, याबाबत माहिती मागितली आहे. तसेच नियोजन करताना लवासा कॉर्पोरेशनलादेखील विचारात घेतले जाणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

लवासामध्ये फिरण्यास येणाऱ्या नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क घेऊ नये, असे आदेश प्राधिकरणाने देऊनही अद्याप वाहनशुल्काच्या नावाखाली सामान्य नागरिकांची लूट लवासा कॉर्पोरेशनने चालवली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने याबाबत चौकशी करून तत्काळ प्रवेश शुल्क आकारणी बंद करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे. दरम्यान, अधिकृत सूत्रे हाती घेतल्यानंतर प्राधिकरणाने लवासा मर्यादित न राहता सर्वासाठी उपलब्ध होण्यासाठी ‘सिटी फॉर ऑल’ संकल्पनेला चालना देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सामान्य नागरिकांना फिरण्यासाठी लवासामध्ये जाताना प्रवेश शुल्क आकारू नये, असे स्पष्ट आदेश देऊनही लवासाकडून अद्यापही मनमानी शुल्क आकारणी सुरूच आहे. सध्या लवासाच्या प्रवेशद्वारापासून आतमध्ये अडीच कि. मी. अंतरावर वाहनतळाच्या नावाखाली चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांकडून अनुक्रमे पाचशे आणि दोनशे रुपये शुल्क आकारले जात आहे.

लवासाच्या आजूबाजूच्या प्रदेशासह संपूर्ण क्षेत्राचा बृहत आराखडा तयार केला जाणार असून याबाबत लवासा कॉर्पोरेशनशी समन्वय साधला जाईल. प्राधिकरणाच्या विकास आराखडय़ाबरोबरच लवासाचाही बृहत आराखडा तयार करण्यात येणार असून त्याबाबतचे आदेश प्राधिकरणाच्या नियोजन विभागाला देण्यात आले आहेत.

– किरण गित्ते, महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण