न्यायालय आणि पोलिसांची दिशाभूल

गुंड बापू नायरची आई आणि पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालय तसेच पोलिसांची दिशाभूल करून पसार होण्यास मदत करणाऱ्या एका वकील महिलेला भारती विद्यापीठ पोलिसांनी वडगाव शेरी भागात पकडले. त्यावेळी तिने पोलिसांशी अरेरावी केली. वकील महिलेने गुंड टोळीच्या कारवायांना पाठबळ दिल्याने तिला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

अ‍ॅड. वर्षां फडके असे अटक करण्यात आलेल्या वकील महिलेचे नाव आहे. मार्केट यार्ड भागातील व्यावसायिकाची जमीन बळकावणारा गुंड बापू नायरविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या (मोक्का) अंतर्गत कारवाई केली होती. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना पाठबळ देणारी आई आणि पत्नीविरुद्ध पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. कारवाई केल्यानंतर पसार झालेल्या नायरची आई आणि पत्नीला पोलिसांनी पकडले, परंतु मोक्कातील आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवला असल्याची बतावणी तिच्या वकिलांनी पोलीस तसेच न्यायालयाकडे केली.

बापू नायर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करून त्यांना अटक केली होती. त्याची आई राणी प्रभाकर नायर आणि पत्नी ज्योती हिच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. मात्र, त्या दोघी पसार झाल्या होत्या. भारती विद्यापीठ पोलिसांनी पसार झालेल्या राणी अणि ज्योती यांना काही दिवसांपूर्वी पकडले होते. दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघींना न्यायालयासमोर हजरदेखील करण्यात आले. मात्र, बापू नायरची वकील अ‍ॅड. वर्षां फडके न्यायालयासमोर हजर झाली. दोघींनी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळवला आहे, अशी बतावणी तिने न्यायालयाकडे केली. अटकपूर्व जामीन मिळवल्यानंतर आरोपींना अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही, असे तिने न्यायालयाला सांगितले होते.

जामीन मिळवल्याबाबतची कागदपत्रे न्यायालयापुढे सादर करण्याची मुदत तिने मागितली. पोलीस तसेच न्यायालयाची दिशाभूल तिने केली व नायरची आई राणी आणि ज्योती यांना पसार होण्यास मदत केली. अ‍ॅड. फडकेने नायर टोळीच्या गुन्हेगारी कारवायांना पाठबळ दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. अ‍ॅड. फडकेविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड आणि पथकाने तिला वडगाव शेरी भागातून रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले.