राज्याच्या विविध भागांत स्थानिक पातळीवर वीज यंत्रणेचे जाळे सक्षम करण्यासाठी  मागील सतरा वर्षांच्या कालावधीत तब्बल पन्नास हजार कोटी रुपयांचा खर्च करूनही स्थानिक यंत्रणा कमकुवतच राहिल्याने वीज खंडित होण्याच्या प्रकारांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. पुरेशी वीज असतानाही स्थानिक कारणांमुळे हा प्रकार होत असल्याची स्पष्ट कबुलीही महावितरणने राज्य वीज नियामक आयोगासमोर नुकत्याच झालेल्या सुनावणीत दिली आहे.

राज्याच्या विविध भागात रोज वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांतून महावितरणचे स्वत:चेच वार्षिक ५२०० कोटी रुपयांचे, तर उद्योग, शेती आणि इतर ग्राहकांचे चौपट नुकसान होत आहे. त्यामुळे हे प्रकार थांबविण्यासाठी वीज क्षेत्रातील तांत्रिक बाबींमधील तज्ज्ञांची समिती नेमण्यात यावी, अशी मागणी राज्य वीज नियामक आयोगाकडे सुनावणीच्या दरम्यान करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीज क्षेत्रातील तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितले.

राज्यात पूर्वी विजेची कमतरता असल्याने वीजकपात केली जात होती. सद्य:स्थितीत राज्याच्या मागणीपेक्षा अधिक विजेची उपलब्धता आहे. तरीही ग्राहकांना दररोज वेगवेगळ्या कारणांनी वीज खंडित होण्याच्या प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. आयोगाची स्थापना झाल्यानंतर गेल्या सतरा वर्षांच्या कालावधीत आयोगाच्या मान्यतेने वीज वाहिन्या, टॉवर, वीज उपकेंद्र, ट्रान्सफार्मर आदींसाठी पन्नास हजार कोटींहून अधिक रक्कम खर्च झालेली आहे. तरीही स्थानिक पातळीवर याच कारणांमुळे वीज खंडित होण्याचे प्रकार होत आहेत. सर्वात कमी वीजगळती आणि सर्वाधिक महसूल देणाऱ्या पुणे शहरातील नागरिकांनाही वीज खंडित होण्याच्या प्रकारांचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

महावितरण कंपनीकडे जादा उपलब्ध असलेल्या विजेपोटी ‘क पॅसिटी चार्ज’ मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षांसाठी राज्यातील  सर्व वीज ग्राहक कपॅसिटी चार्जेसच्या नावे वीजदराद्वारे ३३६३ कोटी रुपये भरत आहेत. मात्र, मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत २१ दिवस १२ ते १११५ मेगॅवॉटपर्यंतची वीजकपात करण्यात आल्याचे आयोगासमोरील सुनावणीत स्पष्ट झाले. या २१ दिवसांसाठी भरलेले कपॅसिटी चार्जेस ग्राहकांना परत देण्यात यावेत, अशी मागणी सुनावणीच्या वेळी ग्राहक प्रतिनिधी डॉ. अशोक पेंडसे यांनी आयोगाकडे केली आहे.

वीज पुरेशी; समस्या नेमकी कुठे?

राज्यात सध्या वीज पुरेशी आहे. त्यामुळे केवळ अकस्मात तुटवडा निर्माण झाल्यासच वीजकपात करण्याच्या सूचना वीज नियामक आयोगाने दिल्या आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर वीज गायब होण्याचे प्रकार वाढतच आहेत. ट्रान्सफॉर्मर बंद पडणे, वीजवाहिन्या तुटणे, खांब कोसळणे, योग्य क्षमतेच्या वाहिन्या किंवा वीजकेंद्र नसणे, त्याचप्रमाणे देखभाल, दुरुस्ती आदींसाठी वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठय़ात स्थानिक व्यत्ययाचे प्रमाण औद्योगिक फिडरवर १५ मिनिटे ते एक तास, औद्योगिक वसाहती- अर्धा ते दोन तास, औद्योगिक शहरे (इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी) एक ते सहा तास, शेतीपंप- (वीज पुरवठय़ाच्या आठ किंवा १० तासांत) दोन ते तीन तास, घरगुती आणि व्यापारी ग्राहक- एक ते चार तास आहे. राज्यात वीज खंडित होण्याचा सरासरी वेळ दोन तासांपेक्षा अधिक आहे.