सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राने केलेल्या लोककला सर्वेक्षणाच्या कामावर सांस्कृतिक संचालकांनी पसंतीची मोहोर उमटवली. यात धर्तीवर राज्यातील अन्य विद्यापीठांनी लोककला सर्वेक्षणाचे काम करावे, अशी अपेक्षा सांस्कृतिक संचालक अजय अंबेकर यांनी सोमवारी व्यक्त केली.
राज्यातील लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशातून लोककला सर्वेक्षणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सांस्कृतिक विभागाने हाती घेतला आहे. सांस्कृतिक संचालनालयातर्फे राज्यातील सर्व विद्यापीठांना हे काम करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागातील लोककलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सांस्कृतिक संचालक अजय अंबेकर यांनी आतापर्यंत झालेल्या कामाची पाहणी करून प्रशंसा केली. याच पद्धतीने राज्यातील सर्व विद्यापीठांनी काम करावे अशी सूचना करण्यात येणार असल्याचे अंबेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राज्य सरकारला कोणत्या पद्धतीने हे सर्वेक्षण अपेक्षित आहे याचे सादरीकरणही त्यांनी केले.
डॉ. शुभांगी बहुलीकर म्हणाल्या, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक आणि लोककलांचे अभ्यासक दादा पासलकर हे पुणे विभागाच्या समितीचे सल्लागार सदस्य आहेत.
डॉ. विकास कशाळकर, प्रा. प्रवीण भोळे आणि चैतन्य कुंटे यांच्यासह पीएच.डी. आणि एम.ए. च्या द्वितीय वर्षांचे मिळून दहा विद्यार्थी या सर्वेक्षणामध्ये सहभागी झाले आहेत. प्रश्नावली तयार करून गोंधळ, लावणी, भारुड, भारड, वासुदेव, िपगळा, खडीगंमत या परंपरागत कलांचे जतन आणि सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहून लोककलांची सेवा करणाऱ्या काही कलाकारांचे ऑडिओ-व्हिडीओ चित्रीकरणही केले
आहे.
या साऱ्या कामाची पाहणी करून अंबेकर यांनी काही सूचना केल्या आहेत. चार टप्प्यांमध्ये हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून जानेवारीमध्ये सांस्कृतिक संचालनालयाला सादर केले जाणार आहे.