‘येत्या दोन वर्षांत अर्थसंकल्पात पाणीप्रश्नासाठी योग्य तरतूद केली तर पुढील तीस वर्ष राज्य टँकरमुक्त होऊ शकेल. ३० हजार कोटी रुपयांत आज महाराष्ट्र टँकरमुक्त करणे शक्य असल्याचे मतही शिरपूर पॅटर्न राबविणारे भूगर्भ शास्त्रज्ञ सुरेश खानापूरकर यांनी रविवारी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात खानापूरकर बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे, सरचिटणीस सुनित भावे आदी उपस्थित होते.
खानापूरकर म्हणाले, ‘अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे खूप पाऊस होतो. मात्र, आपण त्याचा पुरेसा उपयोग करून घेत नाही. आपल्याकडे भूजल पातळी वाढविण्याची गरज असून नदी नाले बारमाही होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी राज्यातील १२२ तालुक्यांत पाऊस होऊनही तेथील धरणे कोरडी आहेत. कालांतराने ही धरणे पिण्याच्या पाण्यासाठीही अपुरी पडण्याची चिन्हे आहेत. आपल्याकडे बंधारे व कालव्यांचे नियोजन योग्य प्रकारे न झाल्यामुळे पाणी साठवून ठेवण्यात आपण अयशस्वी ठरत आहोत. आपण एका वर्षांत पुढील तीन वर्ष पाणी पुरेल असे नियोजन करू शकतो.’