वीजमीटर बसवण्यासाठी, जोडणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून लाच मागण्याच्या प्रकरणांत वाढ

पोलीस, महसूल खात्यातील लाचखोरीची प्रकरणे कायम चव्हाटय़ावर येत असतात. अन्य शासकीय कार्यालयातही लाचखोरी बोकाळली आहे. त्यात ‘महावितरणचा’देखील समावेश आहे. यंदा वर्षी महावितरणमधील अभियंते, विद्युत सहायक (लाइनमन) लाचखोरीच्या प्रकरणात अडकले आहेत. विशेषत: पुणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात वीजमीटर देण्यासाठी लाच मागण्याच्या प्रकारांनी जोर धरला आहे.

गेल्या काही वर्षांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठय़ा प्रमाणावर लाचखोरांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. तसेच लाचखोर कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार देण्यासाठी जनजागृती मोहीमही राबवली जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाच्या कक्षेत पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हे पाच जिल्हे येतात. एसीबीने पुणे विभागातील विविध शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी लाचखोरीला आळा घालण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यावर भर दिला. भित्तिपत्रके, टोल फ्री क्रमांक, व्हॉट्स अ‍ॅप अशा माध्यमांचा वापर करून लाचखोरांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन केले. त्यामुळे लाच मागणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी तक्रारदार एसीबीशी संपर्क साधू लागले आहेत. पोलीस, महसूल खात्याबरोबरच महावितरणमधील कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याची प्रकरणे यंदा अधिक उजेडात आली आहेत, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

जोपर्यंत तक्रारदार तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत, तोपर्यंत एसीबीचे पथक स्वत:हून कारवाई करत नाही. तक्रारदार पुढे आल्यानंतर सापळा लावला जातो, असेही सांगण्यात आले. गेल्या काही वर्षांत महावितरणमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून करार पद्धतीवर भरती केली जाते. ठेकेदारी पद्धतीने काम करणारे कर्मचारी नागरिकांना त्रास देतात. वीजमीटर बसविण्यासाठी पैसे मागणे, घरावरून गेलेली वीजवाहिनी काढून टाकण्यासाठी लाच मागणे अशा घटना उघडकीस येत आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात महावितरणमधील कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले आहे, असेही एसीबीमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

वीजमीटर बसविण्यासाठी पंख्याची मागणी

लाचखोरीच्या प्रकरणात वडगाव मावळमधील महावितरणच्या कार्यालयातील एका अभियंत्याने वीजमीटर बसविण्यासाठी एका ग्राहकाकडे पैशांऐवजी पंखा मागितल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणात कारवाई सुरू आहे. चिरिमिरी घेण्याची सवय बऱ्याच शासकीय खात्यांमधील कर्मचाऱ्यांना असते. मात्र, लाचेपोटी पंखा मागण्याचे प्रकरण चांगलेच गाजले.

विभागनिहाय सापळे

महसूल  ३२

पोलीस  ३२

महावितरण      १४

जिल्हा परिषद   १०

भूमी अभिलेख   ७

सहकार खाते    ३

महापालिका     २

प्रादेशिक परिवहन विभाग  १

 

विभागनिहाय एसीबीचे सापळे

पुणे- १४०

नाशिक- १०४

नागपूर- १०१

मुंबई- ४८

(२५ सप्टेंबर अखेपर्यंत)