पिवळेधम्मक हापूस आंबे इवल्याशा हातामध्ये पकडण्याची कसरत.. तल्लीन होऊन आंब्याची चव चाखणारे चिमुकले.. तोंडावरून ओघळत असलेला आमरस.. एकानंतर दुसरा असा आंब्यांवर मारलेला ताव.. छोटय़ा भीमसोबत केलेल्या गमतीजमती आणि स्पर्धाजिंकण्याची चढाओढ.. अशा मधुर वातावरणात बाळगोपाळांनी मंगळवारी आंब्याचा गोडवा चाखला.
निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे शुभारंभ लॉन्स येथे वंचित आणि विशेष मुलांसाठी आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माहेर, लोकमंगल, बचपन वर्ल्ड, घरटे, नूतन विद्यालय, आयडेन्टिटी फाउंडेशन या संस्थांतील अडीचशेहून अधिक मुले या उपक्रमामध्ये सहभागी झाली होती. या स्पर्धेत दत्ता जाधव, विजय गायकवाड, मनीषा काळे, आशा लोखंडे यांनी विशेष पारितोषिक पटकाविले. स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, जयेश कासट, अनराज सोळंकी, रमेश सोळंकी, संध्या झंवर, श्यामसुंदर भुतडा, विशाल राठी, नीलेश सोनगिरा, आदित्य शर्मा, जगदीश मुंदडा, धीरज धूत, विराज तावरे, प्रवीण पवार या वेळी उपस्थित होते.