भारतासह राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मावळ तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मावळमधील शेतऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाताची रोपे लावली आहेत. पण पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भात लागवडीच्या प्रक्रियेला सुरवात झाली. यंदा पाऊस अधिक कृपादृष्टी करेल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे भाताचं पिक जोमदार येईल, अशी आस शेतकरी बाळगून आहेत.  मात्र पावसान दडी मारल्यामुळे भाताची रोप पडली आहेत. त्यामुळे पुण्याच्या मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची  चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मान्सूनने १ जून पूर्वीच कृपा केल्याने सर्वच शेतकरी आनंदित झाले होते, मात्र नंतर पावसाने उघड घेतल्याने ५० टक्के रोपे मृत पावण्याच्या परिस्थितीत आहेत. पुढील चार-पाच दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे मावळमधील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. मावळ तालुक्यात ११ हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. त्यापैकी ३ हजार हेक्टरहून अधिक जमिनीवरील भाताची रोप पावसाअभावी धोक्यात आहेत.

सध्या वाफेत रोपे लावलेल्या शेतकऱ्यांची ही परिस्थिती असताना गादी वाफेत रोपे लावलेल्या शेतकऱ्यांना मात्र आणखी दहा दिवस पाऊस पडला नाही तरी चालणार आहे. मात्र येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही, तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समस्या वाढणार आहेत. त्यामुळे त्याला पिकाची काळजी लागली आहे. पिक वाया जाईल, या भीतीने तो चिंतातूर झाल्याचे दिसते.