चिंचवड परिसरात मोबाईल चोरटय़ाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून सात मोबाईल संच जप्त करण्यात आले.
आदेश दिलीप लुंकड (वय ३०, रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या चोरटय़ाचे नाव आहे. लुंकड याने वेगवेगळ्या ठिकाणांहून मोबाईल चोरले होते. तो चिंचवड स्टेशन ते मोहननगर रस्त्याने एका कापडी पिशवीत सात मोबाईल संच घेऊन निघाला होता. पिंपरी पोलीस ठाण्यातील हवालदार दादाराम जाधव यांना ही माहिती मिळाली. बुधवारी (२२ जून) पोलिसांनी तेथे सापळा लावला. पोलिसांनी लुंकड याला पकडले. त्याच्याकडील पिशवीतून ३७ हजारांचे सात मोबाईल संच जप्त करण्यात आले. त्याने मोबाईल कोठून चोरले यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मसाजी काळे, बाळासाहेब अंतरकर, श्रीनिवास कामुनी, अरूण बुधकर, विजय जाधव, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, प्रदीप सुर्वे, महादेव जावळे, जावेद पठाण, लक्ष्मण आढारी, दादा धस, उमेश वानखेडे, अमोल जगताप, सुहास डंगारे, संतोष भालेराव यांनी ही कारवाई केली.