साताऱ्याच्या कास पठारावर संशोधकांना पालीची नवीन प्रजाती सापडली आहे. गोल आकाराची बुब्बुळे, करडा- तपकिरी रंग आणि अंगावर अधूनमधून पिवळ्या रंगाचे डाग असलेल्या या पालीच्या प्रजातीला ‘नेमॅस्पिस गिरी’ ( Cnemaspis girii) असे नाव देण्यात आले आहे.
बंगळुरूच्या ‘नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस’ आणि ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ या संशोधन संस्थांच्या चमूने या पालीचे विश्लेषण केले आहे. सरिसृप जीवांच्या अभ्यासात ‘बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे संशोधक डॉ. वरद गिरी यांच्या असलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या नावावरून या पालीचे नामकरण करण्यात आले आहे.
गोल आकाराची बुब्बुळे हे या पालीचे वैशिष्टय़ आहे. इतर पालींची बुब्बुळे मांजरीच्या बुब्बुळांसारखी उभी असतात. ही पाल कास पठारावरील दाट झाडीत सापडत असून ती कडेकपारीत आणि झाडांच्या मध्ये असणाऱ्या फटींमध्ये आश्रय घेते. ही नवीन प्रजाती सापडल्यामुळे कास पठारावरील जैवविविधतेसंबंधी आणखी अभ्यास होण्याची गरज अधोरेखित झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.     
जून २०१० मध्ये हर्षल भोसले, झीशान मिश्रा आणि राजेश सानप यांना ही पाल कास पठारावर प्रथम सापडली होती. ‘नेमॅस्पिस’ या जीवशाखेतील केवळ दोन पालींच्या प्रजाती राज्याच्या दक्षिण भागात सापडतात. ही पाल त्या दोन्हीपैकी कोणत्याच प्रजातीची नसल्याचे लक्षात आले. मग या नवीन पालीची प्रजाती कोणती, हे समजून घेण्यासाठी मिश्रा आणि सानप यांनी लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये जाऊन देशात सापडणाऱ्या पालींच्या इतर प्रजातींविषयी माहिती घेतली. अभ्यासानंतर ही पाल इतर नेमॅस्पिस पालींपेक्षा वेगळी असून तिचे नव्याने नामकरण व विश्लेषण होण्याची गरज त्यांना वाटली. पालींचे अभ्यासक सौनक पाल यांनीही या पालीच्या वेगळेपणावर शिक्कामोर्तब केले. गेल्या वर्षी (२०१३) भोसले आणि मिश्रा यांनी पुन्हा कास पठारावर जाऊन या पालीचा अभ्यास केला होता.