सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘मिस्टर अँड मिसेस’ नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच प्रेक्षागृहामधील वकिलांच्या अश्लील शेरेबाजीच्या ‘प्रॉम्प्टिंग’ने नाटकाचा तमाशा केला. या प्रकारामुळे कलाकारांना प्रयोग करणे अशक्य झाले होते. अखेरीस काही काळ थांबवून पुन्हा हा प्रयोग कसाबसा पूर्ण केला गेला. ‘पुणे तेथे सभ्यता उणे’ असे झाले की काय, असा प्रश्न करीत मधुरा वेलणकर आणि चिन्मय मांडलेकर या कलाकारांनी सोशल मीडियावर हा अनुभव मांडला आहे.
पुणे बार असोसिएशनने ‘मिस्टर अँड मिसेस’ नाटकाचा प्रयोग शुक्रवारी रात्री टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित केला होता. बहुतांश वकील, न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य हेच या प्रयोगाच्या वेळी उपस्थित होते. असे असताना अश्लील शेरेबाजीचा प्रकार झाला आहे.  
सांस्कृतिक पुण्याच्या लौकिकाला गालबोट लावणारा हा प्रकार घडला. त्यामुळे कलाकारांना प्रयोग थांबवावा लागला होता.
मांडलेकर यांनी याबाबत फेसबुकवर लिहिलेल्या मजकुरात म्हटले आहे की, नाटकभर प्रेक्षकांमधून अश्लील शेरेबाजी होत राहिली. इतकी की एका क्षणी नाटक थांबवायला लागले. पुढे अर्थात प्रयोग पार पडला. पण या घटनेतून पुन्हा एकदा जाणवले की आपल्या देशात शिक्षण आणि सुसंस्कृतपणा याचा काहीही संबंध नाही. प्रयोगामध्ये एका क्षणाला माझ्या प्रत्येक वाक्याला प्रेक्षकांमधून ‘कमेंट’ यायला सुरुवात झाली. त्यामुळे प्रयोग थांबवून आम्हाला प्रेक्षकांना खरोखरच नाटक पाहण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारावा लागला.
संवेदनशील विषयावर नाटक असल्याने आम्ही सरसकट कोणत्याही संस्थेसाठी या नाटकाचा प्रयोग करीत नाही. मात्र, पुणे बार असोसिएशनसारख्या संस्थेकडून विचारणा झाल्यानंतर आम्ही या प्रयोगासाठी तयार झालो. पण, कायद्याशी संबंधित लोकांकडून नाटकावर अशा प्रकारची शेरेबाजी झाल्याने आम्हाला धक्का बसला असल्याचे मधुरा वेलणकर हिने सांगितले.

पुणे बार असोसिएशनने वकिलांसाठी आयोजित या नाटकाला मी उपस्थित नव्हतो. मात्र, जो काही प्रकार घडला तो चुकीचाच असून त्याबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, या घटनेत सगळेच वकील चुकीचे नाहीत. ज्या वकिलांनी या कार्यक्रमात गोंधळ घातला त्यांनी पुणे बार असोसिएशनकडे माफीपत्र द्यावे. या प्रकारामुळे वकिली व्यवसायाची बदनामी होत आहे.
 – अ‍ॅड. असिम सरोदे.

 असा कोणताही प्रकार घडलेला नाही. अशी घटना घडली असती तर नाटकातील कलाकारांनी सत्कार स्वीकारायचा नव्हता. नाटकाला प्रसिद्धी मिळविण्यासाठी आमची बदनामी करणाऱ्यांवर तसेच, सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल. नाटक सुरू असताना शिट्टय़ा वाजविल्या जात होत्या. त्यावेळी त्यांनी खूप आवाज येत असल्याचे म्हटले होते. पण, नाटक बंद केले असा कोणताही प्रकार घडलेला नाही.
– अ‍ॅड. विकास ढगे-पाटील, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

‘समाजाची बौद्धिक पातळी दाखविणारा प्रकार’
विक्रम गोखले (ज्येष्ठ अभिनेते)
आम्ही चुकत असू, प्रयोग करताना पाटय़ा टाकत असू  तर आमच्याविषयी जरुर तक्रार करा. पण अंधारात बसायचे आणि प्रकाशातील कलाकारांवर अशी चिखलफेक किंवा अश्लील शेरेबाजी करायची, हे अत्यंत चुकीचे आहे. कला क्षेत्रातला तो मोठा गुन्हा आहे. समाजाची बौद्धिक लायकी काय आहे, त्याचे दर्शन घडविणारा हा प्रकार आहे. या शेरेबाजीमुळे मधुरा आणि चिन्मय यांनी नाटक थांबवले हे योग्यच केले.
प्रेक्षक आम्हा कलाकारांना विकत घेऊ शकत नाही. खरे तर हा प्रकार घडला तेव्हा उपस्थितांपैकी काही समंजस प्रेक्षकांनी अशी शेरेबाजी करणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढायला हवे होते.
नाटक सुरु असताना अनेक प्रेक्षकांचा भ्रमणध्वनी सुरु असतो. मी नेहमीच या प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. ज्यांना नाटकातले काही कळत नाही, अशा प्रेक्षकांची मला गरज नाही.     

मोहन जोशी (अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते)
अशा पद्धतीने अश्लील शेरेबाजी करणे ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. या प्रकाराचा जाहीर निषेधच झाला पाहिजे. हे नाटक खूप चांगले आहे. ती मुले गंभीरपणे हे नाटक करत आहेत. अश्लील शेरेबाजी करावी असे नाटकात काहीही नाही. तरीही उपस्थित प्रेक्षकांकडून अशा प्रकारची शेरेबाजी व्हावी हे क्लेशदायक आहे.  

प्रशांत दामले (मराठी व्यावसायिक नाटय़निर्माता संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते)
अश्लील शेरेबाजीचा हा प्रकार निषेधार्ह आणि चुकीचाच आहे. कदाचित फुकट वाटण्यात आलेले पासेस् आणि ज्यांना नाटकातील काहीही कळत नाही अशा प्रेक्षकांकडून असे प्रकार होतात.  नाटकाला आलेला प्रेक्षक सुजाण व सुसंस्कृत असतो. अशा प्रेक्षकांसाठीही भ्रमणध्वनी बंद करा, लहान मुल रडत असेल तर त्याला नाटय़गृहाबाहेर घेऊन जा, अशा सूचना कराव्या लागतात, हेही योग्य नाही. प्रेक्षकांनी ते स्वत:हून समजून घेतले पाहिजे.    
(संकलन-शेखर जोशी)