दातांचे ‘रुट कॅनॉल’ उपचार करताना दिलेल्या इंजेक्शननंतर कर्वेनगरमधील एका ३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. दातांच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करून मुलीच्या पालकांनी कोथरूड पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सानवी निरंजन रेवतकर (वय ३ वर्षे, २ महिने) असे मृत मुलीचे नाव आहे. सानवीचे वडील निरंजन रेवतकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार, सानवीचे पाच दात किडल्यामुळे तिला २६ जूनला राहुलनगरमधील ‘डॉ. कुलकर्णी फॅमिली डेंटल केअर’ या दवाखान्यात नेण्यात आले होते. तपासणीनंतर तेथील दंतचिकित्सक डॉ. अंकुर कुलकर्णी यांनी तिच्या एका दाढेचे रुट कॅनाल करण्यास सांगितले, तर इतर ४ दातांमध्ये सिमेंट भरण्यास सांगितले होते. त्यानुसार २६ आणि २७ तारखेला दाढांमध्ये सिमेंट फिलिंग करण्यात आले. सोमवारी (२९ जून) सकाळी ११.३० च्या सुमारास सानवीच्या दाढेचे रुट कॅनाल होणार होते. रुट कॅनाल करताना प्रथम तिच्या दाढेजवळ भूल देण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर दाढेच्या ठिकाणी ड्रिल करून त्यातून पल्प बाहेर काढला आणि दातात तीन वेळी हायड्रोजन पॅरॉक्साईडचे इंजेक्शन दिले. तिसरे इंजेक्शन टोचून बाहेर काढताना सानवी अचानक घाबरल्यासारखे करू लागली. तेव्हा डॉक्टरांनी तिच्या दाढेत कापसाचा बोळा घालून तिच्या पालकांना तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले. पालकांनी तिला उचलले असता तिचे डोळे पांढरे झाले व तिने हालचाल करणेही बंद केले. रेवतकर म्हणाले,‘डॉ. कुलकर्णी यांनी मुलीची नाडी पाहिली नाही. त्यांनी मला मुलीला शेजारीच असलेल्या बालरोगतज्ज्ञांच्या दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. बालरोगतज्ज्ञांनी प्रयत्न करूनही तिच्या हृदयाचे ठोके लागत नसल्यामुळे तिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.’
या प्रकरणी पोलिसांकरवी मेडिकल बोर्डाअंतर्गत डॉक्टरांच्या पॅनेलसमोर मृताचे शवविच्छेदन करण्यात आले असून ‘केमिकल अॅनालिसिस’ व ‘हिस्टोपॅथोलॉजी’चे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.