भाजपला ‘अच्छे दिन’ आले, तसे दुसऱ्या पक्षातील लोंढे भाजपमध्ये येऊ लागले. पिंपरी-चिंचवडमध्ये हे प्रमाण जरा जास्तच आहे. प्रतिकूल परिस्थितीत वर्षांनुवर्षे प्रस्थापितांशी संघर्ष करून ज्यांनी पक्ष जिवंत ठेवला, तो वर्ग या लोंढय़ांमुळे अस्वस्थ आहे. पक्षात ‘नवा-जुना’ असा सुप्त संघर्ष उघड सुरू झाला आहे. पक्षात नव्याने येणारा पाहुणा तुपाशी आणि घरचा निष्ठावंत कार्यकर्ता उपाशी, अशी वेळ आमच्यावर आणू नका, अशी भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर वेगवेगळी गणिते डोक्यात ठेवून ‘सत्ताधारी’ भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली, त्याला पिंपरी-चिंचवडही अपवाद नाही. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राष्ट्रवादीचे तत्कालीन ‘सुभेदार’ लक्ष्मण जगताप यांनी आमदारकी वाचवण्यासाठी आणि राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी भाजपची वाट धरली. समर्थकांची ताकद आणि भाजपच्या हक्काच्या मतांच्या जोरावर ते तिसऱ्यांदा आमदार झाले. जगताप भाजपवासी झाल्यानंतर शहरातील राजकीय गणिते वेगाने बदलली. जगताप समर्थकांनी एकेक करत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. पिंपरीचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी उपमहापौर माई ढोरे, अमर मूलचंदाणी, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, कुमार जाधव, राजेश पिल्ले, बाबू नायर, चंद्रकांत नखाते, संतोष बारणे, पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश चोंधे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष हर्षल ढोरे अलीकडेच भाजपमध्ये आले. माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दत्ता गायकवाड, काँग्रेस नगरसेविका जयश्री गावडे यांचे पती वसंत गावडे भाजपमध्ये दाखल झाले. काही माजी महापौर व अन्य पदाधिकारी भाजपचे दार ठोठावत आहेत. जगतापांना मानणारे डझनाहून अधिक नगरसेवक भाजपच्या उंबरठय़ावर आहेत. अपक्ष आमदार महेश लांडगे पितृपंधरवडा झाला की भाजपमध्ये दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत किमान नऊ नगरसेवक भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहे.

भाजपशी घरोबा करणाऱ्या पाहुण्यांची रीघ लागल्याने भाजपचे बळ चांगलेच वाढणार आहे. यापूर्वी, अंकुश लांडगे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा होती, तेव्हा शहर भाजपला बरे दिवस होते. सन २००२ मध्ये लांडगे यांची रणनीती, भोसरीतील नात्यागोत्याचे राजकारण, विलास लांडे यांच्याशी केलेली हातमिळवणी आदींमुळे भाजपने महापालिका निवडणुकीत १५ जागाजिंकल्या होत्या. पुढे, संघटन वाढवतानाच भोसरी विधानसभेला गवसणी घालण्याचे भाजपचे डावपेच होत असताना सन २००७ च्या निवडणुकांच्या तोंडावर अंकुश लांडगे यांचा खून झाला आणि भाजपचा बुरूज कोसळला. तरीही तेव्हाच्या निवडणुकीत भाजपला नऊ जागा मिळाल्या होत्या. पुढे, भाजपला उतरंड लागली ती लागलीच. एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली सन २०१२ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. मतांची टक्केवारी नीचांकी ठरली. शहरात भाजपला मानणारा मोठा वर्ग आणि हक्काचे मतदान असताना ही नामुष्की ओढावली.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार, अजित पवार यांच्यासारखे तगडे उमेदवार असतानाही भाजपच्या डॉ. प्रतिभा लोखंडे, पृथ्वीराज जाचक, विराज काकडे या उमेदवारांना शहरभरातून भरभरून मतदान झाल्याची नोंद आहे. तरीही भाजपला पिंपरी-चिंचवडमध्ये बस्तान बसवता आले नाही. कारण, लांडगे वगळता स्थानिक पातळीवर भाजपला सक्षम नेतृत्व मिळाले नाही. या पाश्र्वभूमीवर भाजपला ‘अच्छे दिन’ येण्याचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच पक्षात नव्याने भरणा होऊ लागला आहे आणि तो जुन्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. आपल्या भवितव्याची चिंता जुन्यांना लागून राहिली आहे. सत्ता नव्हती, तेव्हा आम्ही लाठय़ा-काठय़ा खाल्ल्या, आंदोलने केली, प्रतिकूल परिस्थितीत निष्ठेने काम केले, सतरंज्या उचलल्या. मोदी लाटेमुळे दिवस पालटले. केंद्रात सरकार आले, राज्यात कधी नव्हे तो भाजपचा मुख्यमंत्री झाला. सत्ता आली तेव्हा मात्र पाहुण्यांचा गोतावळा वाढू लागला. जगताप आले, ते नेते झाले. सारंग कामतेकर, बाबू नायर दुसऱ्या पक्षातून आले आणि थेट सरचिटणीस झाले. लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन राष्ट्रवादीतच होते, त्यांना लाल दिवा मिळाला. अमर साबळे बारामतीचे, त्यांना खासदारकी मिळाली. आमदार-खासदार आणि पटवर्धन हे भाजपचे तीन शिलेदार. मात्र, त्यांची कार्यपद्धती अनेकांना मान्य नाही. शहराध्यक्षांच्या मनात काय चालले आहे, कोणाला समजत नाही. खासदार दौरे अन् बैठका यातच व्यस्त असतात. पटवर्धन सतत दौऱ्यांवर असतात, अशा स्थानिक कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत.

नेत्यांनी गटबाजीचे राजकारण करू नये, पक्षाच्या खऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करावा, फक्त स्वत:च्या पुढे-पुढे करणाऱ्यांचा विचार करू नये, ही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र तसे होत नसल्याने नेत्यांच्याच तक्रारी वपर्यंत होऊ लागल्या आहेत. अलीकडे, नवीन प्रवेश झाला की तक्रारी होतात, हे समीकरण रूढ झाले आहे. काँग्रेस नगरसेविकेच्या पतीला भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे धुसफूस सुरू झाली. प्राधिकरणातील काँग्रेसचे बाळा िशदे यांना पक्षप्रवेश दिल्यानंतरही तोच प्रकार झाला. शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखास थेट प्रवेश दिल्याचे प्रकरण आमदार महेश लांडगे यांच्या जिव्हारी लागले. स्थानिक नेत्यांवर कोणाचे नियंत्रण नसल्याने हा सावळागोंधळ सुरू आहे. पालकमंत्र्यांचेही लक्ष नाही. ‘लक्ष्य २०१७’ साठी पक्षाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, पक्षात रुजत असलेली नवी संस्कृती भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीत चालणारे राजकारण भाजप कार्यकर्त्यांना भाजपमध्ये नको आहे. नव्यांचे लाड करण्याच्या नादात निष्ठावंत दुरावता कामा नयेत. दुसऱ्या पक्षातील नाराज मंडळी भाजपमध्ये येत असतील, तर भाजपचा नाराज झालेला वर्ग दुसरीकडे जाणार नाही कशावरून, याची नोंद घ्या, अशी सूचक भाषा भाजप कार्यकर्ते करत आहेत.