सगळीकडे आता दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळी म्हटली की फटाके, खरेदी आणि आवर्जून आठवण येते ती दिवाळीतल्या फराळाची. फराळ म्हटले की आठवण येते ती ‘पर्वती कॉर्नरच्या चकली’ची. चकल्यांपासून करंज्यांपर्यंत आणि चिवडय़ाच्या अनेक प्रकारांपासून वेगवेगळ्या लाडूंपर्यंत विविध खाद्यपदार्थ मिळणाऱ्या या व्यवसायाचं खरं नाव ‘नलिनी खोजे क्रिस्पी अ‍ॅन्ड करीज’ असं चांगलं लांबलचक आहे. मात्र या नावानं या दुकानाला ओळखणारे फारच कमी जण असतील. तऱ्हेतऱ्हेचे वैशिष्यपूर्ण खाद्यपदार्थ मिळणाऱ्या या दुकानाची खरी ओळख ‘पर्वती कॉर्नरची चकली’ अशीच आहे.

नलिनी खोजे मूळच्या इचलकरंजीच्या. विवाहानंतर त्या पुण्यात आल्या. वेगवेगळे पदार्थ उत्तम रीतीनं बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. नातेवाइकांमध्येही त्यांची त्यासाठी ख्याती आहे. विशेषत: चकली आणि बेसनाचे लाडू ही त्यांची खासियत. सात-आठ वर्षांपूर्वी त्यांनी छोटय़ा प्रमाणात चकल्या तयार करून त्या काही ग्राहकांना दिल्या होत्या आणि त्यातूनच पुढे फराळाच्या पदार्थाचा एक मोठा उद्योग उभा राहिला. अर्थात नलिनी खोजे यांचा मूळचा व्यवसाय वेगळाच होता. घरगुती पद्धतीनं डबे तयार करून ते सकाळ-संध्याकाळ पुरवण्याचा व्यवसाय त्यांनी घरातल्या घरात सुरू केला होता.

घर लहान, जागा छोटी. त्यामुळे हा व्यवसाय घरातल्या घरातच त्या छोटय़ा स्वरुपात चालवत असत. आठ-दहा वर्षांपूर्वी त्यांच्याकडे काही जणांनी दिवाळीपूर्वी विचारणा केली की तुम्ही फराळाचे पदार्थ बनवून द्याल का. त्या मागणीनुसार खोजे यांनी चकली, चिवडा, करंजी वगैरे काही पदार्थ तयार करून दिले आणि त्यातूनच ग्राहकांची मागणी पुन्हा पुन्हा यायला लागली. ही मागणी पुढे एवढी वाढत गेली की मूळचा डबे देण्याचा व्यवसाय बंद करून नलिनी खोजे यांनी चकली, चिवडा, ओल्या नारळाच्या करंज्या, लाडू हे पदार्थ बनवून त्यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

मागणी जशी वाढू लागली तसे मग त्यांचे पती रामचंद्र आणि मुलगा राकेश हेही दोघे याच व्यवसायात पूर्णवेळ आले. अर्थात वर्षभर व्यवसाय करायचा तर पदार्थामध्ये वैविध्यही असलं पाहिजे, हे ओळखून मूळच्या काही पदार्थाना खोजे यांनी इतर अनेक पदार्थाची जोड दिली.

चकली, साधी शेव, लसूण शेव, पातळ पोह्य़ांचा चिवडा, कोल्हापुरी लसूण चिवडा, प्रवासी चिवडा, भाजक्या पोह्य़ांचा चिवडा, नाचणी चिवडा, बुंदी, रवा, बेसन, खजूर, नाचणी, डिंक यांचे लाडू, गोड आणि खारे शंकरपाळे, अनारसे, नारळ बर्फी, बटाटा चिवडा, तिखट पुरी, भडंग, शिवाय पुरणपोळी, गूळ पोळी असे अनेकविध पदार्थ इथे वर्षभर उपलब्ध असतात.

खाद्यपदाथार्ंचा व्यवसाय चांगला चालवायचा तर चवीत सातत्य राखावं लागतं. ही सर्वात अवघड गोष्ट असली तरी खोजे कुटुंबीयांना ती चांगलीच जमली आहे. त्यामुळेच कोणत्याही सणाच्या आधी दोन-तीन दिवस आणि दिवाळीपूर्वी तर आठवडाभर या दुकानाच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात. ग्राहकांकडून पसंतीची अशी पावती मिळत असल्यामुळेच खोजे यांच्या घरातील सर्व मंडळी पदार्थाच्या दर्जावर सतत लक्ष ठेवून असतात. चकलीची भाजणी योग्यप्रकारे तयार होत आहे ना, हे स्वत: नलिनी खोजे पाहतात.

विविध पदार्थ तयार करण्यासाठी यंत्रसामग्री वापरली जात असली तरी पदार्थाची चव कायम ठेवण्यासाठी उत्तम दर्जाचा कच्चा माल वापरायचा, त्याच्या दर्जात कुठेही तडजोड करायची नाही, हे तत्त्व आमच्याकडे आवर्जून पाळलं जातं, असं राकेश सांगतो. त्याचं उदाहरणही त्याच्याकडूनच ऐकायला मिळालं. बाजारात चणा बेसन मिळतं आणि तुलनेनं स्वस्त असं वाटाणा बेसनही मिळतं. पण कितीही महाग असलं तरी खोजे यांच्याकडे चणा बेसनच वापरलं जातं. अशीच कितीतरी उदाहरणं राकेशकडून ऐकायला मिळाली. इथे येणारे ग्राहक खूप चोखंदळ असल्यामुळे प्रत्येक पदार्थाच्या चवीबाबत आणि दर्जाबाबत कुठेही तडजोड केली जात नाही. फराळाच्या तयार पदार्थाना वर्षभर चांगली मागणी राहू शकते, हे खोजे यांच्या व्यवसायाने म्हणजे त्यांच्या चवीने सिद्ध केलं आहे.

दिवाळीपूर्वी आठवडाभर आधी फराळाचे पदार्थ घेण्यासाठी इथे रांगाच्या रांगा लागतात. अर्थात या रांगा इथेच थांबत नाहीत. या रांगा पाहून ज्यांना या व्यवसायाची माहिती नसते, ते दिवाळी संपली की इथे औत्सुक्यानं येतात आणि एवढय़ा रांगा का होत्या याची चौकशी करतात.

काय काय मिळतं अशीही विचारणा करतात. काही पदार्थ आवर्जून घेऊन जातात आणि असे लोक या दुकानाचे मग पुढे अगदी हक्काचे ग्राहक बनतात..

कुठे आहे?

पर्वती पायथा चौक ते महाराष्ट्र बँक या रस्त्यावर

सकाळी दहा ते दुपारी तीन,

दुपारी चार ते रात्री साडेआठ

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…

feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून