बससेवा सुधारणेचा लेखाजोखा मांडला

विविध मागण्यांवरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आणि पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्यात खडाजंगी झाल्यानंतर पीएमपीच्या एकत्रीकरणानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील गुणात्मक वाहतूक सेवेचा लेखाजोखाच पीएमपीने मांडला आहे. या शहरातील मार्ग, सरासरी बसची संख्या, उत्पन्न अशा काही घटकांच्या माध्यमातून सुधारणा करण्यात आल्याचा दावा करीत पीएमपी प्रशासनाने सापत्न वागणुकीचा राज्यकर्त्यांचा आरोप चुकीचा असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट करीत सुधारणांचा दाव्याने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराला सक्षम बससेवा पुरविण्यात येत नसल्याचा आरोप करीत काही मार्ग सुरु करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली होती. त्यांच्या या मागण्यांवरून संचालक मंडळाची शुक्रवारी झालेली पहिलीच बैठक वादळी ठरली होती. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आणि सावळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. वादाच्या या पाश्र्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बससेवेच्या एकत्रीकरणानंतर या शहरात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला आहे.

पुणे विभागातून पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या बसची संख्या २९९ आहे. विलीनीकरणापूर्वी पिंपरी-चिंचवडकडे पुणे शहराशी संपर्क ठिकाण हे केवळ पुणे स्टेशनच होते. त्यानंतर बससेवेमध्ये वाढ झाल्यानंतर विश्रांतवाडी, हडपसर, शेवाळवाडी, भेकराईनगर, कात्रज, मार्केटयार्ड, धायरी, कोथरूड डेपो, वारजे-माळवाडी, पुणे मनपा, डेक्कन, स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, कोथरूड स्टॅण्ड, हिंजवडी असी सोळा संपर्क ठिकाणे झाली आहेत. एप्रिल महिन्यापूर्वी महामंडळाच्या यंत्रशाळा विभागात बस संख्येच्या तुलनेत सेवकांच्या संख्येचे प्रमाण विषम होते. काही आगारात सेवकांचे प्रमाण १: ४ तर काही आगारात ०.५ असे होते. परिणामी बस दीर्घकाळ बंद राहणे, मार्गावर बंद पडणे तसेच देखभाल दुरुस्ती कामकाज योग्य वेळी आणि गुणात्मक होण्यास अडचणी येत होत्या. महामंडळाकडील सर्व यंत्रणशाळा विभागाकडील सेवकांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे विभागांना कर्मचारी उपलब्ध होऊन देखभाल दुरुस्ती कामकाजाध्ये सुधारणा झाली. दीर्घकाळ बंद असलेल्या गाडय़ा मार्गावर आल्या.

ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झाले, असा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे.

पिंपरी-चिंचवड विभागाकडील बस मार्ग सुरु करण्याच्या मागणीच्या अनुषंगानेही मार्गाबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे पीएमपीने दिली आहे. या विभागाकडे ३९ मार्ग सुरु करण्यात आले असून मार्गावर ७५ बस संचलनात आहेत. संचलनामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मार्ग सुरू करण्याच्या मागणीबाबत निकष तपासून ते सुरू करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

तपशील                      एकत्रीकरणापूर्वीची स्थिती          सद्य:स्थिती              वाढ

एकूण मार्ग                                 ५३                                      ९३                       ४०

नियोजित बस                           १८५                                     ३७८                    १९३

सरासरी बससंख्या                     १३५                                     ३४०                   २०५

तीन आगारांतील बस                 २५२                                     ८५४                    ३०३