पुण्यात भाजपला डावलून परस्पर विकासकामांचे श्रेय लाटणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला चाप लावण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी एक नवी मागणी लावून धरली आहे. आगामी काळात पालकमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवल्याशिवाय विकासकामांचे उद्घाटन करता येणार नाही, असा नियम घालून देण्यात यावा, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली आहे. गिरीश बापट यांनी राजशिष्टाचार विभागाला यासंबंधी पत्र पाठवून ही मागणी केली आहे. सध्या पुण्यातील पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीकडून विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावले जात नाही. त्यामुळे आता कोणत्याही कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याआधी पालकमंत्र्यांची परवानगी घ्यावी, अशी मागणी बापट यांनी राज्य सरकारकडे केली आहे. पालकमंत्र्यांची परवानगी  घेतली नाही तर कार्यक्रमाचा खर्च संयोजकांकडून वसुल करण्याची मागणीही बापट यांनी पत्रात केली आहे. दोन्ही पालिकांसह जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांसाठी हा नियम असावा अशी मागणी यात करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार याबाबतीत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.