४९ गुन्हे दाखल, मात्र राज्य शासनाच्या शिफारशीनंतर गुन्हे काढून घेतले जाण्याची शक्यता

प्रचारफेरीत तीनपेक्षा जास्त वाहनांचा वापर, मोठय़ा आवाजात ध्वनिवर्धकाचा वापर, मतदारांना प्रलोभन दाखवणे किंवा त्यांना पैशाचे वाटप करणे आदी प्रकारचे गुन्हे नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीतील उमेदवारांविरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आचारसंहिताभंग केल्याप्रकरणी पोलिसांकडून उमेदवारांविरुद्ध ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करून पोलिसांकडून संबंधित उमेदवाराविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात येईल. मात्र, आचारसंहितेच्या गुन्हय़ांचे पुढे काय होणार? हा प्रश्न पोलिसांसमोर आहे. कारण राज्य शासनाच्या शिफारशीनंतर आचारसंहिताभंगाचे गुन्हे काढून घेण्यात येतात. आचारसंहिताभंगाचे गुन्हे केवळ शोभेसाठी किंवा दाखवण्यापुरते दाखल करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत विविधपक्षीय उमेदवारांनी कोटय़वधी रुपयांचा चुराडा केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात १२ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाली होती. मतमोजणीच्या दिवशी आचारसंहिता मागे घेण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी मतदारांना अनेकविध मार्गाचा वापर करून प्रलोभने दाखवली. आचारसंहितेच्या काळात संक्रांतीचा सण असल्याने उमेदवारांकडून विविध गृहोपयोगी वस्तूंचे वाटप महिलांना करण्यात आले. अशा प्रकारच्या घटनांचे पेव शहरात फुटले होते. महिलांनी उमेदवारांकडून देण्यात येणाऱ्या संक्रांतीच्या वाणाची लयलूट केली. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारीदेखील करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल करण्याचा प्रश्न नव्हता.

महापालिका निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांकडून आचारसंहिताभंग करण्यास सुरुवात झाली. मतदारांना प्रलाभने दाखवण्यात आली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदारांना लक्ष्मीदर्शनाचा योग घडवण्यात आला. काही भागांत मतदारांसाठी वाहनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आचारसंहिताभंगाचे ४९ गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ३८ उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरात आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. पिंपरीत ११ गुन्हे दाखल झाले आहेत.

हे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येते. मात्र, अशा प्रकारचे गुन्हे काढून घेण्याचा अधिकार सरकारला आहे. आचारसंहिताभंगाचे गुन्हे काढून घेण्यासंदर्भात राज्य शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात येते. ती अधिसूचना गृहखात्याकडे पाठवण्यात येते. त्यानंतर आचारसंहिताभंगाचे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते. आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल करणे एवढेच काम पोलिसांकडून केले जाते. अशा प्रकारचे गुन्हे हे गंभीर स्वरूपातील नसतात. त्यामुळे या गुन्हय़ांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.

मतदानाच्या दिवशी दाखल झालेले गुन्हे

ठिकाण दखलपात्र     आचारसंहिताभंग      अदखलपात्र

पुणे              १                  ३                          ८

पिंपरी         १                    १                           ६

 

मतमोजणीनंतर दाखल झालेले गुन्हे

ठिकाण    दखलपात्र     आचारसंहिताभंग      अदखलपात्र

पुणे             ०               ३                              ३

पिंपरी         १                २                              ४